Russia-Ukraine War: पुतीन १४ वर्षांनी पुन्हा तोच गेम खेळले; Playbook चं सीक्रेट नेमकं काय?, अमेरिकेलाही कळेना काय करावे...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 02:53 PM2022-02-23T14:53:00+5:302022-02-23T15:03:09+5:30

Russia-Ukraine War: रशिया युक्रेनबाबत एक फॉर्म्युलाचा वापर करत आहे की जो याआधी देखील वापरण्यात आला होता. काय आहे पुतीन यांचं Playbook सीक्रेट

रशिया आणि युक्रेनमधील तणाव आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच रशियानं मोठी खेळी करत राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे बंडखोर डोनेत्स्क आणि लुहंस्क यांना स्वतंत्र देशाचा दर्जा दिला. तसंच तिथं आपलं सैन्य देखील पाठवलं आहे. अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांनी रशियावर अनेक निर्बंध आणण्यास सुरुवात केली आहे. तसंच अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी युक्रेनला लष्करी सहाय्य करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

जगभरात युक्रेन आणि रशियातील या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या महायुद्धाची शंका वर्तविण्यात येत आहे. यासर्वांमध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे ती व्लादिमीर पुतीन यांच्या 'सीक्रेट प्लेबुक'ची. सर्वात आधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी पुतीन यांच्या प्ले-बुकचा उल्लेख केला होता. पुतीन यांच्या सीक्रेट प्ले-बुकनुसारच युक्रेन विरुद्धच्या युद्धाची कारवाई केली जात असल्याचं ते म्हणाले.

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार रशियानं युक्रेनच्या सीमेवर १.५ लाखाहून अधिक सैनिक तैनात केले असल्याची माहिती अँटनी ब्लिंकन यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत दिली. तसंच रशियाकडून युक्रेनच्या राजधानीला लक्ष्य केलं जाण्याचा प्लान असल्याचाही गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. पुतीन यांच्या प्ले-बुकमध्ये नेमकं काय आहे? याबाबत काही माहिती आता समोर आली आहे.

गेल्या वर्षी एक पुस्तक प्रदर्शित झालं होतं. हे पुस्तक अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे माजी अधिकारी रेबेका कॉफलर यांनी प्रकाशित केलं होतं. त्यांच्या पुस्तकाचं शिर्षक Putins Playbook: Russia's Secret Plan to Defeat America असं होतं. म्हणजेच अमेरिकेला पराभूत करण्याचा सीक्रेन प्लान असा त्याचा अर्थ होता. व्लादिमीर पुतीन यांनी सोव्हियत संघाचं पतन झाल्यामुळे रशियाचा झालेला अपमान कसा मनावर घेतला होता याबाबत नमूद करण्यात आलं होतं. पश्चिमी देशांच्या विरोधातील युद्धासाठी रशियाला कसं ग्रेट पावरहाऊस बनवता येईल यासाठी पुतीन यांनी प्रयत्न सुरू केले, असंही त्यात नमूद आहे.

१९९१ साली जेव्हा सोव्हियत संघाचं पतन झालं त्यावेळी अनेक देशांचा उदय झाला. या देशांमध्ये विविध पातळीवर अनेक छोटी-मोठी युद्ध व संघर्ष झाले. जसं की माल्दोवाच्या ट्रान्सनिस्ट्रिया, जॉर्जियामधील द.ओसेशिया आणि अबाकाजिया. या सर्व संघर्षांमध्ये रशियाची स्वत:ला नेहमीच एक मोठ्या भूमिकेत पाहत आला आहे. रशियानं आता युक्रेनच्या दोन बंडखोरांना स्वतंत्र देशाचा दर्जा जाहीर करत युक्रेनवर मोठी चाल खेळली आहे.

रशियानं डोनबासमध्येही अशीच रणनिती ठेवली. जो याआधी युक्रेनचा भाग होता. रशियाच्या दाव्यानुसार डोनेत्स्क आणि लुहंस्कमधील फुटीरतावादी हे स्थानिक नागरिक होते की ज्यांनी युक्रेन सरकारविरोधात शस्त्र हाती घेतली. पण प्रत्यक्षात रशियानंच या दोन्ही ठिकाणी फुटीरतावाद्यांना समर्थन देत हत्यार पुरवले होते असं सांगितलं जातं. आता युक्रेन या दोन्ही ठिकाणांना स्वतंत्र देशाची मान्यता दिली आहे. आता पुतीन यांच्या प्ले-बुकमधील प्लाननुसार रशियाचं पुढचं पाऊल हे डोनबासला युक्रेनपासून पूर्णपणे वेगळं करणं असणार आहे.

डोनबासला युक्रेनपासून पूर्णपणे वेगळं करुन तिथं आपलं सैन्य घुसवण्याचा रशियाचा मानस आहे. जेणेकरुन युक्रेन पुर्णपणे विखुरला जाईल आणि पश्चिमी देशांना आपलं सैन्य या ठिकाणी तैनात करणं खूप कठीण होऊन बसेल. याचं संपूर्ण प्लानिंग २०१४ सालापासूनच सुरू झाल्याचं म्हटलं जातं. डोनबासमध्ये तेव्हापासूनच रशिया समर्थक फुटीरतावाद्यांचा युक्रेन सरकारसोबत संघर्ष सुरू झाला आहे. तसंच पुतीन देखील गेल्या काही महिन्यांपासून डोनबासच्या मुद्द्यावर वारंवार भाष्य करत आले आहेत.

अमेरिकेचं जगावरील वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी पुतीन यांच्या ज्या प्ले-बुकची चर्चा होत आहे त्याची सुरुवात युक्रेनमध्ये पाहायला मिळत असल्याचं बोललं जात आहे. २००८ साली याची जॉर्जियामध्ये चाचणी झाल्याचंही दिसून आलं आहे. जिथं रशियानं वेगानं हल्ला करत विरोधी शक्तींना गुडघे टेकायला भाग पाडलं होतं. २००८ साली देखील रशियानं जॉर्जियावर नरसंहार केल्याचा आरोप केला होता.

युक्रेनसारखंच जॉर्जियाला देखील नाटोमध्ये सामील होण्याची इच्छा होती. तर जॉर्जियानं नाटोमध्ये सहभागी होऊ नये अशीच रशियाची इच्छा होती आणि यात रशियाला यश देखील आलं होतं. २००८ साली रशियानं त्यावेळी जॉर्जियातील बंडखोर अबकाजिया आणि द.ओसेशियाला देखील स्वतंत्र देशांची मान्यता दिली होती. स्वतंत्र देशाची मान्यता देत रशियानं तिथं आपलं सैन्य धाडलं होतं. आता हाच फॉर्म्युला रशियानं युक्रेनबाबतही लागू केला आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत केलेल्या वक्तव्यानुसार रशिया युक्रेनवर विविध टप्प्यात हल्ला करण्याची शक्यता आहे. रशियाकडून युक्रेनच्या नागरिकांवर ड्रोन स्ट्राइक आणि बॉम्बहल्ल्यांचा आरोप लावला जाण्याची शक्यता आहे. युक्रेनकडून नरसंहार सुरू असल्याचं कारण देत रशिया आपले मनसुबे साध्य करू शकतं, असा प्लान असल्याचं ते म्हणाले. तसंच युक्रेनमधील रशियन नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रतिहल्ला करत असल्याचा दावा रशियाकडून केला जाऊ शकतो. याच पद्धतीची खेळी रशियानं जॉर्जिया युद्धावेळी केली होती. रशियन माध्यमं देखील यास हवा देण्याचं काम करू शकतात असंही ब्लिंकन म्हणाले.