Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमध्ये तर युद्ध पेटलं, जगातील 'या' देशांमध्येही युद्ध भडकण्याचा मोठा धोका By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 10:34 AM 2022-02-26T10:34:41+5:30 2022-02-26T10:51:55+5:30
जगात केवळ रशिया आणि युक्रेनच नाहीत, तर अनेक देश आज युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. सध्या संपूर्ण जगातच प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना सकटाचा सामना करणारे जग आता कुठे सावरत असतानाच रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून तणावाचे वातावरण होते आणि अखेर हे प्रकरण युद्धापर्यंत जावून पोहोचले. पण जगात केवळ रशिया आणि युक्रेनच नाहीत, तर अनेक देश आज युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातही अनेक दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे.
1. चीन आणि तैवान - वादाचे कारण - दुसऱ्या महायुद्धानंतर चीनमध्ये राष्ट्रवादी पक्ष कॉमिंगतांग आणि आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात संघर्ष सुरू झाला. 1949 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरकार स्थापन झाले. माओ त्से तुंग राष्ट्रपती बनले. यानंतर कॉमिंगतांग पक्षाचे लोक तैवानला पळून गेले आणि त्यांनी तो स्वतंत्र देश घोषित केला.
1949 मध्ये चीनचे नामकरण 'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' आणि तैवानचे नामकरण 'रिपब्लिक ऑफ चायना' असे करण्यात आले. दोन्ही देश एकमेकांना मान्यता देत नाहीत. आतापर्यंत केवळ 13 देशांनीच तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. चीन तैवान आपलाच भाग असल्याचा दावा करतो.
युद्धाचा धोका का? - चीन नेहमीच तैवानवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. चिनी लढाऊ विमाने अनेकदा तैवानच्या सीमेत प्रवेश करतात. नुकतेच, रशियाने युक्रेनवर हल्ला करताच चीनची 9 लढाऊ विमानं पुन्हा तैवानमध्ये शिरली होती. युक्रेनच्या संकटाचा फायदा चीन घेऊ शकतो, अशी भीती तैवानने व्यक्त केली आहे.
2. अझरबैजान आणि आर्मेनिया - वादाचे कारण - अझरबैजान आणि आर्मेनिया हे दोन्ही देश पूर्वी सोव्हिएत युनियनचा भाग होते. यो दोन्ही देशांत नागोर्नो-काराबाख या भागावरून वाद आहे. खरे तर 1980 च्या दशकापासूनच या दोन्ही देशांत या भागावरून वाद सुरू आहे.
जेव्हा सोव्हिएत युनियनचे विघटन झाले, तेव्हा नागोर्नो-काराबाख अझरबैजानकडे गेले. अझरबैजान हा एक मुस्लीम देश आहे आणि आर्मेनिया हा ख्रिश्चन बहुल देश आहे. नागोर्नो-काराबाखची बहुसंख्य लोकसंख्या ही ख्रिश्चन आहे. यामुळेच या जागेवरून दोन्ही देशांत वाद सुरू आहेत.
युद्धाचा धोका का? - सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले. 1994 मध्ये युद्धविराम करारही झाला होता. परंतु यानंतरही दोन्ही देश भांडत असतात. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये या देशांत भीषण युद्ध झाले होते. या युद्धात 50 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला होता. आताही या देशांमध्ये लष्करी चकमकी सुरूच असतात.
3. सौदी अरेबिया आणि इराण - वादाचे कारण - सौदी अरेबिया आणि इराण हे दोन्ही इस्लामिक देश आहेत, पण सौदीमध्ये सुन्नी आणि इराणमध्ये शिया मुस्लीम अधिक आहेत. दोन्ही देश मध्यपूर्वेमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. इस्लामचा उगम सौदीमध्ये झाला, असे मानले जाते, यामुळे ते स्वतःला मुस्लीम देशांचे नेते म्हणून दाखविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, इराणमधील 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर परिस्थिती बदलली. दोघांचीही सीरिया, बहारीन आणि येमेनसारख्या देशांवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याची इच्छा आहे. सीरियात इराण समर्थित सरकार आहे. तर येमेनमध्ये सौदीचा हुथी बंडखोरांशी संघर्ष सुरू आहे, ज्यांना इराण पाठिंबा देतो.
युद्धाचा धोका का? - सौदी अरेबिया आणि इराण हे दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जातात. येमेनमध्ये सौदी आघाडी आणि इराण समर्थित हुथी बंडखोरांमध्ये संघर्ष सुरू आहे. या दोघांमध्ये अनेक दशकांपासून शीतयुद्ध सुरू आहे. कधी कधी युद्धासारखी परिस्थितीही निर्माण होते. मे 2019 मध्येच सौदीने इराणला युद्ध नको, पण इराणपासून स्वतःचे संरक्षण करेल, असा इशारा दिला होता. मात्र, गेल्या वर्षी इराकने पुढाकार घेऊन दोन्ही देशांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
4. इस्रायल आणि पॅलेस्टाईन - वादाचे कारण - 1948 मध्ये पॅलेस्टाईनचे विभाजन झाले आणि इस्रायल अस्तित्वात आला. पॅलेस्टाईनला 55 टक्के आणि इस्रायलला 45 टक्के एवढा भू-भाग मिळाला. इस्रायल ज्यू देश आहे. तर पॅलेस्टाईन मुस्लीम देश आहे. जेरुसलेमला राजधानी करण्यासाठी दोघांमध्ये लढा सुरू आहे. इस्रायलने जेरुसलेमला आपली राजधानी घोषित केले आहे. मात्र, अद्याप याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही.
पॅलेस्टाईनकडे आता दोन मोठे भाग शिल्लक आहेत, यात गाझा आणि वेस्ट बँक यांचा समावेश आहे. वेस्ट बँक शांत आहे, तर गाझा अशांत आहे. गाझावर हमासचे नियंत्रणही आहे. पण, इस्रायल हमासला दहशतवादी संघटना असल्याचे बोलतो.
युद्धाचा धोका का? - या दोन्ही देशांमध्ये 1956, 1967, 1973 आणि 1982 मध्ये युद्धे झाली आहेत. या युद्धांमध्ये इस्रायलने पॅलेस्टाईनच्या मोठ्या भूभागावर कब्जा केला आहे. आता केवळ 20 टक्के जमीनच पॅलेस्टाईनकडे उरली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष सुरूच असतो. गेल्या वर्षीही इस्रायलने हमासवर तर हमासने इस्रायलवर बॉम्बिंग केली होती.
5. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया - वादाचे कारण - दुसऱ्या महायुद्धानंतर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया अस्तित्वात आले. या पूर्वी येथे जपानचे राज्य होते. दक्षिण कोरियामध्ये ऑगस्ट 1948 मध्ये आणि उत्तर कोरियामध्ये सप्टेंबर 1948 मध्ये निवडणुका झाल्या. पण 1950 मध्ये उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर हल्ला केला. अमेरिकेसह 15 देशांनी दक्षिण कोरियाला पाठिंबा दिला तर रशिया-चीनने उत्तर कोरियाला पाठिंबा दिला. 1953 मध्ये युद्ध संपले आणि दोन स्वतंत्र देश अस्तित्वात आले. फाळणीनंतरही दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. उत्तर कोरियाला दक्षिण कोरियावर कब्जा करायचा आहे.
युद्धाचा धोका का? - 1968 मध्ये, उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न केला. 1983 मध्ये, म्यानमारमध्ये झालेल्या स्फोटांत 17 दक्षिण कोरियाई नागरिकांचा मृत्यू झाला होता. यासाठी उत्तर कोरियाला दोषी मानले जाते. उत्तर कोरिया सातत्याने अणुचाचण्या करत आहे. दोघांमधील तणाव जगाला अणुयुद्धाकडेही नेऊ शकतो.