Russia-Ukraine War: चोहोबाजुंनी घेरले तरी युक्रेन पडेना! जेलेंन्स्कींना कुठून होतोय एवढा शस्त्र पुरवठा, रशियाला पडले कोडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 12:17 PM2022-03-08T12:17:01+5:302022-03-08T12:26:14+5:30

Russia-Ukraine War after 13 days: युक्रेनला जमिन, पाणी आणि हवेत रशियाने घेरले आहे. मग युक्रेनला कोणत्या मार्गाने एवढा शस्त्रपुरवठा केला जातोय. अमेरिकेची विमाने दर तासाला युक्रेनसाठी शस्त्रास्त्रे घेऊन झेपावत आहेत. परंतू, ती युक्रेनमध्ये येत नाहीएत मग कुठे जातात, हेच रशियाला आणि जगाला न सोडविता आलेले कोडे झाले आहे.

रशियाने युक्रेनला ४८ तासांत नमविण्याचा प्रयत्न केला, परंतू तोच तोंडघशी पडला आहे. युक्रेनचे सैन्य आणि नागरिक एवढ्या चिवटपणे लढत आहेत की आज तेरा दिवस झाले तरी एक दोन शहरे सोडली तर काहीही रशियाच्या हाती लागलेले नाही. यामुळे रशियाच आता कोड्यात पडला आहे. युक्रेनची ताकद एवढीही नाहीय की रशियाच्या फौजांना ते प्रतिकार करू शकतील, मग त्यांना एवढा शस्त्रपुरवठा कुठून केला जातोय हेच पुतीन यांना समजत नाहीय, अशी अवस्था आहे.

युक्रेनला जमिन, पाणी आणि हवेत रशियाने घेरले आहे. मग युक्रेनला कोणत्या मार्गाने एवढा शस्त्रपुरवठा केला जातोय. अमेरिकेची विमाने दर तासाला युक्रेनसाठी शस्त्रास्त्रे घेऊन झेपावत आहेत. परंतू, ती युक्रेनमध्ये येत नाहीएत मग कुठे जातात, हेच रशियाला आणि जगाला न सोडविता आलेले कोडे झाले आहे.

जगभरात अमेरिका आणि रशिया हे दोन असे देश आहेत की ज्यांच्याकडून निम्मे निम्मे देश शस्त्रास्त्रे विकत घेतात आणि आपले सैन्य बळकट करतात. अशा बलाढ्य रशियासमोर युक्रेन अजूनही टिकल्याने रशियाचेही गर्वहरण झाल्याशिवाय राहणार नाही.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी देखील कीव्हमध्येच ठाण मांडले आहे. अमेरिका त्यांना तेथून नेण्यासाठी जीवाचे रान करत आहे. तर रशिया त्यांना मारण्यासाठी जंग जंग पछाडत आहे. रशियाला चेर्नोबिल, सुमी सारखी काही शहरे ताब्यात घेता आली आहेत. युक्रेनचे एकही मोठे शहर अजून पडलेले नाही. खारकीवमध्येही जोरदार लढाई सुरु आहे.

अमेरिका आणि नाटोने युक्रेनला सैन्य पाठविलेले नाही, परंतू शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणावर पाठविलेला आहे. युद्धाच्या आधी देखील अमेरिकेने युक्रेनमध्ये भलेमोठा शस्त्रास्त्र भांडार रिते केले होते. आताही शस्त्रास्त्रे पाठविण्यासाठी अमेरिका आणि नाटो देश हवा आणि सिक्रेट मार्गांचा वापर करत आहेत.

रशियाला ही रसद जर तोडता आली तर युक्रेनवर लवकरता लवकर विजय मिळविता येणार आहे. रशियाने ३१ शत्रू राष्ट्रांची यादी जाहीर केली आहे. तसेच युक्रेनला मदत करणाऱ्या शेजारी देशांना हल्ला करण्याची धमकी दिली आहे. यामुळे पोलंडने २८ लढाऊ विमाने देण्यास युक्रेनला नकार दिला आहे.

युक्रेन सीमेजवळ असलेल्या गुप्त एअरफील्डचा अमेरिका शस्त्रे पुरवण्यासाठी वापर करत आहे. या तळाचे ठिकाण उघड करण्यात आले नसले तरी ते युक्रेनच्या पश्चिम सीमेच्या अगदी जवळ असलेल्या पोलंड किंवा शेजारील देशांमध्ये कुठेतरी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

विशेष म्हणजे रशियाने युक्रेनच्या पूर्व भागातून हल्ला केला असून अनेक शहरे ताब्यात घेण्याचे युद्ध सुरू आहे. मात्र युरोपातील देशांना लागून असलेल्या युक्रेनच्या पश्चिम भागात अजूनही युक्रेनियन सैन्याचे वर्चस्व आहे.

या एअरफील्डवरून दररोज सुमारे 17-18 लष्करी विमाने उडत आहेत किंवा लष्करी उपकरणे घेऊन येत आहेत. या शस्त्रांमध्ये क्षेपणास्त्रांचाही पुरवठा केला जात आहे. यूएस संरक्षण अहवालानुसार, अमेरिका आणि नाटो देशांनी आतापर्यंत युक्रेनला 17000 रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे, 2000 विमानविरोधी स्टिंगर क्षेपणास्त्रांचा पुरवठा केला आहे.

शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याच्या या रस्त्यावरून आणि हवाई मार्गावरून रशियन हल्ल्याच्या शक्यतेबाबत पाश्चात्य देशही सतर्क असून त्यामुळे कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

जपानी माध्यमांमध्येही या तळांबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. त्यानुसार, अमेरिकन हवाई दलाच्या सी-17 मालवाहू विमानांमधून ही शस्त्रे गुप्त तळापर्यंत पोहोचवली जातात. या ऑपरेशनमध्ये साध्या वेशातील लोकांचा समावेश आहे जे मालवाहू विमानामधील झाकलेली क्षेपणास्त्रे उतरवत आहेत.

ही क्षेपणास्त्रे त्या तळांवर जास्त काळ ठेवली जात नाहीत आणि कमीत कमी वेळात ती युक्रेनच्या सीमेकडे हलवली जात आहेत. या तळावर दररोज 17-18 विमाने लष्करी उपकरणे घेऊन येत आहेत, त्यापैकी फक्त 4-5 अमेरिकन मदतीची विमाने आहेत. उर्वरित मदत इतर पाश्चिमात्य देशांकडून येत आहे.