Russia Ukraine War: जगाचं नाही पण या आठ लोकांचा सल्ला ऐकतात व्लादिमीर पुतीन, हे आहेत त्यांचे शक्तिशाली सल्लागार By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 04:58 PM 2022-03-04T16:58:02+5:30 2022-03-04T17:05:14+5:30
Russia Ukraine War: जगाचं न ऐकणारे Vladimir Putin नेमकं कुणाचं ऐकतात असा प्रश्न लोकांना पडला आहे. तर त्याचं उत्तर पुढीलप्रमाणे आहे. पुतीन यांचं एक खास सर्कल आहे. ज्यामध्ये काही नेते. गुप्तहेर खात्यांचे अधिकारी यांच्यापासून लष्करातील दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. पुतीन त्यांचा सल्ला ऐकतात. तसेच त्यानुसार निर्णय घेतात. या व्यक्ती पुढीलप्रमाणे. अमेरिकेसह अनेक बलाढ्य देशांचा दबाव झुगारून रशियाने गेल्या आठवड्यात युक्रेनवर हल्ला केला होता. अमेरिका आणि युरोपमधून लादलेल्या आर्थिक निर्बंधांचाही काही परिणाम रशियावर आणि पुतीन यांच्यावर झालेला नाही.
अशा परिस्थितीत जगाचं न ऐकणारे व्लादिमीर पुतीन नेमकं कुणाचं ऐकतात असा प्रश्न लोकांना पडला आहे. तर त्याचं उत्तर पुढीलप्रमाणे आहे. पुतीन यांचं एक खास सर्कल आहे. ज्यामध्ये काही नेते. गुप्तहेर खात्यांचे अधिकारी यांच्यापासून लष्करातील दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. पुतीन त्यांचा सल्ला ऐकतात. तसेच त्यानुसार निर्णय घेतात. या व्यक्ती पुढीलप्रमाणे
सर्गेई शोईगू (रशियाचे संरक्षणमंत्री) रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोईगू हे व्लादिमीर पुतीन यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे पुतीन यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. २०१४ मध्ये रशियाने जेव्हा क्रिमियावर हल्ला केला होता. तेव्हा त्या विजयाचं श्रेय शोईगू यांनाच मिळाले होते.
वेलेरी गेरासिमोव्ह (रशियाचे लष्करप्रमुख) वेलेरी गेरासिमोव्ह रशियाचे लष्करप्रमुख आहेत. युक्रेनवर हल्ला करून त्यावर विजय मिळवण्याची जबाबदारी गेरासिमोव्ह यांच्याकडे आहे. १९९९मध्ये चेचेन्या युद्धामध्येही गेरासिमोव्ह यांची महत्त्वाची भूमिका होती.
निकोलाई पातरूशेव्ह (सुरक्षा परिषदेतील सदस्य) निकोलाई पातरुशेव्ह हे पुतीन यांच्या सर्वात निकटवर्तीयांपैकी एक आहेत. पातरूशेव्ह आणि व्लादिमीर पुतीन हे १९७० च्या दशकापासून एकत्र आहेत. पुतीन यांच्याप्रमाणे पातरूशेव्ह हे सुद्धा सोव्हिएट युनियनच्या केजीबी या गुप्तहेर संस्थेचे गुप्तहेर होते.
अलेक्झँडर बोर्टनिकोव्ह अलेक्झँडर बोर्टनिकोव्ह हे रशियाची गुप्तहेर संस्था एफएसबीचे प्रमुख आहेत. २००८ मध्ये पातरूशेव्ह यांनी जेव्हा एफएसबीचे पद सोडले तेव्हापासून बोर्टनिकोव्ह यांच्याकडे हे पद आहे. पातरूशेव्ह प्रमाणेच बोर्टनिकोव्ह हेसुद्धा पुतीन यांच्यासोबत अनेक दशकांपासून काम करत आहेत.
सर्गेई नारिश्किन (फॉरेन इंटेलिजेन्स सर्व्हिसचे संचालक) सर्गेई नारिश्किन हे रशियातील व्यावसायिक आणि राजकारणी आहेत. ते २०१६ पासून फॉरेन इंटेलिजन्स सर्व्हिसचे संचालक आहेत. नारिश्किन हे १९९० च्या दशकापासून पुतीन यांच्यासोबत आहेत. ते पुतीन यांचे विश्वासू आहेत.
सर्गेई लावरोव्ह ( रशियाचे परराष्ट्रमंत्री) सर्गेई लावरोव्ह २००४ पासूनच रशियाचे परराष्ट्रमंत्री आहेत. लावरोव्ह हे रशियातील सर्वात सीनियर डिप्लोमॅट्स आहेत. सोव्हिएट युनियनच्या श्रीलंकेतील दुतावासातून त्यांनी आपले काम सुरू केले होते.
व्हेलेंटिना मातवियोंको (फेडरेशन कौन्सिलच्या अध्यक्षा) पुतीन यांच्या अंतर्गत सर्कलात व्हेलेंटिना मातवियोंको या एकमेव महिला आहेत. त्याही अनेक दशकांपासून पुतीन यांच्यासोबत काम करत आहेत. २०१४ मध्ये क्रिमियाच्या रशियातील विलिनीकरणामध्ये त्यांनी पुतीन यांना मदत केली होती. तसेच त्यांनी सेंट पीटर्सबर्गच्या गव्हर्नर म्हणूनही काम पाहिले होते.
व्हिक्टर जोलोतोव्ह (नॅशनल गार्डचे डायरेक्टर) व्हिक्टर जोलोतोव्ह हे पुतीन यांच्या सर्वात विश्वासार्ह व्यक्तींपैकी एक आहेत. ते कधीकाळी पुतीन यांचे बॉडीगार्ड होते. मात्र सध्या ते नॅशनल गार्डचे डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत. २०१६ मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.