युक्रेनला गिळण्याची पुतीन यांनी भयानक महत्वाकांक्षा, ५० हजार सैनिकांचा बळी देण्याची तयारी! By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 01:29 PM 2022-02-27T13:29:14+5:30 2022-02-27T13:34:56+5:30
रशिया आणि युक्रेनमधील युद्धात रशियानं आता अधिक आक्रमक भूमिका घेत संपूर्ण युक्रेनवर ताबा मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. रशियन सैन्याची आक्रमकता पाहता राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची महत्वाकांक्षा स्पष्टपणे दिसून आली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता अधिक तीव्र झालं आहे. युक्रेनची राजधानी कीववर कब्जा करण्याची तयारी रशियानं सुरू केली आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमधील अनेकांनी आपला जीव युद्धात गमावला आहे. यातच अशी माहिती समोर आली आहे की जी अत्यंत धक्कादायक आणि भयानक आहे.
ब्रिटिश गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी 'द मिरर' वृत्त समूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत रशियन फौजा रासायनिक शस्त्रांचा वापर करू शकतात अशी शक्यता वर्तवली आहे. इतकंच नव्हे युक्रेनवर कब्जा करण्यासाठी रशियानं आपल्या ५० हजार सैनिकांचा बळी देण्याची तयारी देखील ठेवली आहे.
गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी सांगितलं की, रशियानं या युद्धात आपल्या ५० हजार सैनिकांचा बळी देण्याची तयारी ठेवली आहे. कारण राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना कोणत्याही परिस्थितीत हे युद्ध जिंकायचं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार पुतीन त्यांना सैन्यातील जवानांच्या मृत्यूची अजिबात चिंता नाही. आतापर्यंत रशियाचे ३५०० सैनिक शहीद झाल्याचं समोर आलं आहे. शहीदांमध्ये रशियाचे सर्वात अनुभवी फोर्स स्पेट्सनाज आणि एअरबोर्न युनिटमधील जवानांचाही समावेश आहे.
क्रूर रणनितीचा वापर करत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आपल्या सैन्य प्रमुखांना रासायनिक शस्त्रांचा वापर करण्याचे आदेश देण्याचीही शक्यता आहे. रशियन फौजांनी जर रासायनिक शस्त्रांचा वापर केला तर त्याचं अप्रूप वाटण्याचं काहीच कारण नाही, असं शस्त्रास्त्र तज्ज्ञ हामिश डी ब्रेटन गॉर्डन यांनी सांगितलं. जर रशियानं रासायनिक शस्त्रांचा वापर केला तर त्यांना तातडीनं रोखण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले. रशियानं रासायनिक शस्त्रांचा वापर आणि रुग्णालयांवर हल्ला करण्यापासून स्वत:ला रोखण्यासाठी एक रेड लाइन तयार करायला हवी असं ते म्हणाले.
युक्रेनमध्ये युद्ध भूमीवर ब्रिटनची गुप्तचर संघटना एमआय-६ काम करत असून रशियाच्या हल्ल्यासंदर्भातील सर्व माहिती नाटो पर्यंत पोहोचविण्यात येत आहे. ब्रिटनच्या तळांवर रशियाकडून हल्ला केला जाऊ शकतो अशी भीती आता व्यक्त करण्यात येत आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धात आतापर्यंत शेकडो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या युद्धात २४० सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात ६४ जणांचा मृत्यू गुरुवारी झाला आहे. मृत्यूंचा प्रत्यक्षाताली आकडा यापेक्षाही अधिक असू शकतो अशीही शक्यता यूएननं व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या मृत्यूचे अनेक आकडे आतापर्यंत समोर येत असले तरी त्यांची अधिकृत पुष्टी मात्र अद्याप होऊ शकलेली नाही. रशियन सैन्यानं शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणांचं नुकसान झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक दैनंदिन गरजांपासून वंचित झाले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तर पिण्याच्या पाण्याचेही वांदे झाले आहेत.
दैनंदिन गरजेच्या वस्तू नागरिकांना मिळणं मुश्कील झालं तर युक्रेनच्या उत्तर-पूर्व आणि दक्षिण-पूर्व भागात मोठं मानवी संकट उभं राहू शकतं अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.