Russia Ukraine War: UNSC मधील निषेध प्रस्तावावर भारताची तटस्थ भूमिका; रशियानं मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 01:17 PM2022-02-26T13:17:28+5:302022-02-26T13:26:39+5:30

Russia Ukraine War: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियानं युक्रेनवरील हल्ला रोखावा आणि सैन्य माघारी बोलवावं यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला.

गेल्या २ दिवसांपासून रशिया-युक्रेन (Russia Ukraine Crisis) यांच्यात युद्ध सुरू आहे. रशियानं युक्रेनवर आक्रमक हल्ला केला असून राजधानी कीववर कब्जा मिळवण्याचा रशियाचा मानस आहे.

सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. जीव वाचवण्यासाठी लोकं बंकचा आधार घेत आहे. अमेरिका, ब्रिटनसह NATO नं रशियाचा हल्ल्याचा निषेध केला आहे.

रशियानं युक्रेनवरील हल्ला रोखावा आणि सैन्य माघारी बोलवावं यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव ठेवण्यात आला. यावेळी रशियानं प्रस्तावावर व्हिटो पॉवर वापरली. सुरक्षा परिषदेत ५ स्थायी सदस्यांमध्ये रशियाचा समावेश आहे. तर भारत, चीन आणि यूएईनं तटस्थ भूमिका घेतली.

यानंतर रशियानं त्यांच्याविरोधात निषेध प्रस्तावाचं समर्थन न केल्यानं भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीचे आभार मानले. ज्यांनी या प्रस्तावाचं समर्थन केलं नाही त्यांची आम्ही आभार मानतो, असं युएनमधील रशियाचे राजदूत वसीली नेबेंजिया यांनी म्हटलं.

भारत, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीने युक्रेनच्या मुद्द्यावरून रशियाचा निषेध करणाऱ्या ठरावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तटस्थ भूमिका घेतली. या प्रस्तावाला ११ देशांनी पाठिंबा दिला असला तरी रशियाने या प्रस्तावावर व्हेटो (Veto) पॉवरचा वापर केला. त्यामुळे हा प्रस्ताव पारित होऊ शकला नाही.

रशिया या प्रस्तावावर व्हेटो करू शकतो, परंतु तो आमच्या आवाजावर व्हेटो करू शकत नाही. सत्याला व्हेटो करू शकत नाही. आमच्या तत्त्वांना व्हेटो देऊ शकत नाही. युक्रेनियन लोकांना व्हेटो करू शकत नाही हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी मतदानानंतर व्यक्त केली.

रशिया संयुक्त राष्ट्र परिषदेत व्हेटो पॉवरचा वापर करणार हे आधीपासून माहिती होतं. तर भारत, चीन आणि यूएई यांनी मतदानात भाग घेतला नाही. तर त्याच वेळी, पाश्चात्य देशांनी सांगितले की, हा प्रस्ताव म्हणजे युक्रेनविरुद्ध आक्रमकता आणि कारवाईसाठी रशियाला जागतिक स्तरावर एकाकी पडल्याचं दाखवण्याचा प्रयत्न आहे.

सुरक्षा परिषदेत भारताचे प्रतिनिधी टी.एस तिरुमुर्ती यांनी सांगितले की, यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या घडामोडींमुळे भारत अस्वस्थ आहे. हिंसा आणि शूत्रत्व तात्काळ संपवायला सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत काही तोडगा निघाला नाही. आम्ही भारतीयांच्या सुरक्षेसाठी चिंतेत आहोत. यूक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुत्सद्देगिरीचा मार्ग सोडला गेला हे खेदजनक आहे. आपल्याला त्याकडे परत यावे लागेल. या सर्व कारणांमुळे भारताने या प्रस्तावापासून दूर राहणे पसंत केले आहे असं त्यांनी सांगितले.

रशिया हा भारताचा सर्वात जुना भागीदार आहे. त्यामुळे सर्वांची नजर भारतावर होती. रशियाच्या विरोधात भारत मतदान करणार की नाही याची चर्चा सुरु होती. परंतु भारतानं रशियाविरोधात आलेल्या प्रस्तावावर मतदानात भाग घेण्यास नकार दिला. तर रशियाच्या विरोधात प्रस्तावाचं समर्थन करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, अल्बानिया, ब्राझील, गेबॉन, घाना, आयरलँड, केनिया, मॅक्सिको आणि नॉर्वे देश पुढे आले.