Russia vs Ukraine War: एकीकडे भीषण युद्ध, दुसरीकडे रशिया-युक्रेनमध्ये थोड्याच वेळात बैठक; काय घडणार?, संपूर्ण जगाचं लागलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 01:48 PM2022-02-28T13:48:52+5:302022-02-28T14:00:57+5:30

रशियाचे सैन्य अधिकारी आज चर्चेसाठी बेलारूसच्या गोमेल शहरात दाखल झाले आहे.

रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केला असून आता या युद्धाला पाच दिवस झाले आहेत. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर या युद्धात जगातील महत्त्वाचे देश प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

रशिया-युक्रेनमध्ये मागील चार दिवसांपासून युद्ध सुरू आहे. सोमवारी पाचव्या दिवशीदेखील युद्ध सुरूच आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. रशियन सैन्यातील 4300 हून अधिकजणांना प्राण गमवावे लागले असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. तर, रशियाच्या हल्ल्यात 116 मुलांसह 1684 नागरीक जखमी झाले असल्याचे युक्रेनने सांगितले. तर, जीवितहानीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले युद्ध आणि अन्य युरोपीयन देशांद्वारे रशियात लावण्यात आलेल्या निर्बंधानंतर रशियन अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यावर सहमती दर्शवली. रशियाचे सैन्य अधिकारी आज चर्चेसाठी बेलारूसच्या गोमेल शहरात दाखल झाले आहे.

भारतीय वेळेनूसार दूपारी 3.30 वाजता रशिया आणि युक्रेनची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे आता या बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

युद्धाच्या पाचव्या दिवशीही रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. आज रशियाने युक्रेनच्या खेरसन आणि खारकीव प्रांतात पुन्हा हल्ले केले. रशियाने खेरसन आणि कारकीवमध्ये मिसाईल हल्ले केले. या मिसाईल हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीयन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातले असून, आर्थिक निर्बधांमुळे रशियाचे चलन असलेले रूबल’ कोसळले डॉलरच्या तुलनेत रूबलमध्ये जवळपास तीस टक्क्यांची घट झाली आहे.

दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान त्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देखील आज एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता या दोन बैठकींकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.