Russia vs Ukraine War: सैन्याच्या ताब्यात येईना! युक्रेनमध्ये 'शिकारी' उतरवण्याच्या तयारीत पुतीन; एवढे खतरनाक की...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 04:43 PM2022-02-26T16:43:19+5:302022-02-26T16:46:07+5:30

Russia vs Ukraine War: युक्रेनला नमवण्यासाठी पुतीन यांचा आक्रमक पवित्रा; सर्वात घातक सैनिकांना उतरवण्याची तयारी

युक्रेन-रशिया युद्ध सुरू होऊन दोन दिवस झाले आहेत. दोन दिवसांत रशियन आक्रमणासमोर युक्रेनची वाताहत झाली आहे. रशियन सैन्याच्या कारवाईत युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. रशियन लष्कर, हवाई दल कारवाया करत असताना आता पुतीन यांनी आणखी एक धोकादायक पाऊल उचलण्याची तयारी केली आहे.

युक्रेनविरुद्धचं युद्ध जिंकण्यासाठी पुतीन कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांनी आता युद्धभूमीवर घातक सैन्य दलाला उतरवण्याची तयारी केली आहे. त्यांना हंटर्स म्हटलं जातं.

हंटर्सच्या प्रत्येक तुकडीला वरिष्ठ युक्रेनी अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचे फोटो दिले जातील. पुतीन हत्या करू इच्छित असलेल्या अधिकाऱ्यांचे फोटो घेऊन हंटर्स त्यांचा शोध घेतील. त्यानंतर त्यांच्या हत्या केल्या जातील.

'द सन'नं दिलेल्या वृत्तानुसार, चेचेन स्पेशल फोर्सेसचे सैनिक जंगलात प्रशिक्षण घेताना दिसले. कीवमधील संभाव्य तैनातीच्या आधी सैनिक नमाज अदा करताना दिसले. रशियन प्रांत असलेल्या चेचेन्या रिपल्बिकचे नेते आणि पुतीन यांचे निकटवर्तीय रमजान कादिरोव काही दिवसांपूर्वीच हंटर्सच्या भेटीसाठी आले होते.

शत्रुराष्ट्र आपल्याला क्रमांक एकचं लक्ष्य मानतो आणि आपल्या कुटुंबाला दुसऱ्या क्रमांकाचं लक्ष्य मानतो, असं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितलं आहे. त्यामुळे झेलेन्स्की यांच्या जीवाला धोका आहे.

चेचेनमधील खतरनाक सैनिकांना हंटर्स नावानं ओळखलं जातं. या सैनिकांना युक्रेनमधील राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले असल्याची चर्चा आहे.

रमजान कादिरोव यांनी लष्कराचे अधिकारी आणि पुतीन यांच्या अन्य सहकाऱ्यांची गुरुवारी भेट घेतली होती. रशिया आणि युक्रेन संघर्ष वाढत चालला आहे. युक्रेनवर विजय मिळवण्यासाठी पुतीन आपल्या सर्वाधिक घातक सैनिकांना युद्धभूमीवर उतरवू शकतात.

रशियन सैन्य त्यांना दिलेल्या मुदतीत लक्ष्य गाठू न शकल्यास त्यांच्याकडून सुरू असलेला हिंसाचार वाढू शकतो. रशियन सैन्य कोणत्याही नियमांचं पालन करत नसल्याचं दिसत आहे.

रशियन सैन्यानं कीववर कब्जा केल्यास रशियाच्या स्पेशल फोर्सेसचे सैनिक झेलेन्स्की आणि त्यांच्या मंत्र्यांच्या हत्या करू शकतात, अशी भीती पश्चिमेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.