Russia Ukraine Peace Deal: रशियन परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान! युक्रेनसोबत काही करारांवर सहमती, युद्ध संपणार? By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 04:00 PM 2022-03-16T16:00:58+5:30 2022-03-16T16:06:31+5:30
युक्रेनमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लावरोव्ह यांनी दिलेले संकते पाहता रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेलं युद्ध आता संपुष्टात येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. कारण रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. यात रशिया आता एक पाऊल मागे हटण्यासाठी तयार झाल्याचं म्हटलं जात आहे.
युक्रेनसोबत काही करार झाले आहेत, असे लव्हरोव्ह यांनी बुधवारी सांगितले. युक्रेनच्या 'न्यूट्रल स्टेटस'चा गांभीर्याने विचार केला जात असल्याचं ते म्हणाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांच्याकडूनही आता रशियाकडे वास्तववादी मागण्या केल्या जात आहेत, अशा वेळी लावरोव्ह यांनी केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.
आपला देश नाटोमध्ये सामील होणार नसल्याचेही जेलेन्स्की यांनी स्पष्टपणे सूचित केले आहे. त्यामुळे रशियानं नरमाईची भूमिका घेण्याचा विचार सुरू केला असल्याचं सांगितलं जात आहे. रशियाला धोका निर्माण करणारी शस्त्रे युक्रेनकडे नसावीत, असे रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.
'युक्रेनकडे रशियाला धोका निर्माण करणारी शस्त्रे नसावीत. आम्हाला धोका नसलेल्या शस्त्रास्त्रांवर आम्ही समन्वय ठेवण्यास तयार आहोत. युक्रेनशी सुरू असलेली चर्चा "कठीण" आहे", असं लावरोव्ह म्हणाले. इतर काही मुद्दे आहेत जे महत्त्वाचे आहेत. यात युक्रेनमध्ये रशियन भाषेचा वापर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समावेश आहे.
जेलेन्स्की यांचा नाटो देशांवर निशाणा 'नाटोमध्ये सामील होण्याचे दरवाजे कसे उघडे आहेत हे आम्ही अनेक वर्षांपासून ऐकत आहोत, परंतु आता आम्ही ऐकत आहोत की आम्ही प्रवेश करू शकत नाही. आणि हे सत्य आहे आणि ते मान्य केले पाहिजे. मला आनंद आहे की आमच्या लोकांना हे समजू लागले आहे आणि ते स्वतःवर आणि आम्हाला मदत करणाऱ्या भागीदारांवर अवलंबून आहेत', असं महत्वाचं विधान जेलेन्स्की यांनी केलं आहे.
दरम्यान, रशिया अधिकचं सैन्य देशाच्या इतर भागांमधून युक्रेनमध्ये बोलावत असल्याचा दावा ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेनं केला आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रशिया आपले नुकसान भरून काढण्यासाठी अतिरिक्त सैन्य मागवत आहे जेणेकरुन त्यांना घातपाताच्या जागी तैनात करता येईल.
कदाचित हेच कारण आहे की रशिया आक्रमण करण्यास धडपडत आहे. या सैनिकांच्या मदतीने रशिया ज्या भागांवर ताबा मिळवला आहे त्यावर आपली पकड मजबूत करेल. दुसरीकडे, रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी त्यांचा देश रशियन वार्ताकारांशी चर्चा सुरू ठेवेल, असं युक्रेनच्या मध्यस्थांनी म्हटलं आहे.
रशियाशी वाटाघाटी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या युक्रेनियन शिष्टमंडळाचे सदस्य आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मिखाइलो पोडोल्याक यांनी ट्विट केले की, 'वाटाघाटी सुरू राहतील. ही एक अतिशय कठीण आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. दोन्ही देशांमध्ये मूलभूत फरक आहेत परंतु तरीही कराराला वाव आहे'
दरम्यान, मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी युक्रेनच्या मुद्द्यावर फोनवरून चर्चा केली. रशियाने जारी केलेल्या निवेदनानुसार, दोघांनी युक्रेनमधील रशियन विशेष लष्करी कारवाई आणि युक्रेनमधून नागरिकांना बाहेर काढण्याबाबत चर्चा केली.