४३ विमानं, ७००० कार अन् १५ हेलिकॉप्टर; व्लादिमीर पुतिन यांची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 03:08 PM2022-02-23T15:08:57+5:302022-02-23T15:25:52+5:30

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनच्या वादावरुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव गेल्या काही आठवड्यांपासून शिगेला पोहोचला आहे. आता युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थित फुटीरतावादी प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या पाश्चात्य देशांच्या भीतीने तणाव आणखी वाढणार आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. एकीकडे अमेरिकेसह सर्व नाटो देशांनी रशियाच्या आक्रमक कृतीचा निषेध केला आहे, तर दुसरीकडे भारत आणि चीनसारख्या मोठ्या राष्ट्रांनी या संपूर्ण वादावर तटस्थ भूमिका घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनच्या वादावरुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

व्लादिमीर पुतिन यांची राजकीय वाटचाल सर्वश्रुत आहे. रशियामध्ये त्यांचे एकहाती वर्चस्व आहे. मोठ्या आणि संपन्न राष्ट्राचे प्रमुख म्हणून त्यांची कारकिर्द उल्लेखनीय म्हणावी लागेल. त्यांचे श्रीमंत राहणीमान, संपत्ती आणि वैयक्तिक आयुष्य याबाबत आजही लोकांमध्ये उत्सुकता आहे.

व्लादिमीर पुतिन हे सार्वजनिक ठिकाणी आपल्या परिवाराविषयी कधीही भाष्य करत नाहीत, तसेच आपल्या मुलींचा उल्लेखही ते सार्वजनिक ठिकाणी टाळतात. जसे त्यांचे कुटुंब हे एक रहस्य आहे, तसेच त्यांची संपत्तीदेखील.

रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन जगातील सर्वात प्रभावी व्यक्तींपैकी एक मानले जातात. एका अहवालानुसार पुतिन यांच्याकडे 160 अब्ज पौंड म्हणजेच 16555 अब्ज रुपयांची संपत्ती आहे.

राजकीय समीक्षक बोरिस नेमत्सोव्ह यांनी पुतिन यांच्याकडे प्रचंड संपत्ती आरोप केला आहे. पुतिन यांच्याकडे 43 विमाने, 7000 कार, 15 हेलिकॉप्टर आणि 4 सुपरयाट आणि सोन्याचं टॉयलेट आहेत.

तसेच मॉस्कोच्या बाहेरील भागात अत्यंत सुरक्षित असलेल्या 'बिलेनियर्स विलेज'मध्ये व्लादिमीर पुतिन यांचा भव्य महाल असल्याचा आरोप केला आहे. हा महाल बंकिगहॅम पॅलेसच्या जवळपास दुप्पट आकाराचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.