Russia Ukraine War: रशियाची बरबादीच बरबादी! काय काय उद्ध्वस्त केले; युक्रेनने लिस्टच जारी केली, पाहून चक्रावाल By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 04:31 PM 2022-03-15T16:31:48+5:30 2022-03-15T16:37:02+5:30
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. रशियाकडून युक्रेनवर दिवसेंदिवस जोरदार हल्ले सुरू असले तरी युक्रेनकडूनही जशास तसं उत्तर दिलं जात आहे. याचीच एक आकडेवारी युक्रेननं जारी केली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धाला तोंड फुटून तीन आठवडे होत आले आहेत. युक्रेननं नाटो संघटनेचा सदस्य होऊ नये म्हणून रशियानं युद्ध पुकारले. त्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी नाटोकडे मदत मागितली. मात्र नाटोनं सैनिक पाठवण्यास नकार दिला. तरीही युक्रेन रशियाचा मोठ्या हिमतीनं सामना करत आहे.
रशियाकडून युक्रेनच्या महत्वाच्या शहरांवर मोठे हवाई हल्ले करण्यात आले आणि यात युक्रेनचं मोठं नुकसान झालं. पण युक्रेनी सैन्यानंही रशियन फौजांच्या नाकी नऊ आणले आहेत. याचीच एक आकडेवारी आता समोर आली आहे.
बलाढ्य रशियाला तोंड देताना युक्रेनी सैन्यानं आतापर्यंत रशियाच्या १३,५०० सैनिकांना ठार केलं आहे. तर ८१ रशियन लढाऊ विमान पाडली आहेत. तसंच आतापर्यंत ९५ हेलिकॉप्टर्स पाडण्यात युक्रेनला यश आलं आहे. रशियाचं हे नुकसान कित्येक कोटींच्या घरात आहे.
युक्रेनी सैन्यानं रशियाचे तब्बल १२७९ रणगाडे उद्ध्वस्त केले आहेत. तसंच ४०४ लढाऊ टँक नेस्तनाभूत करण्यात युक्रेनला यश आलं आहे. रशियन सैन्याची ६४० वाहनं आतापर्यंत उद्ध्वस्त झाली आहेत. इतकंच नव्हे, तर रशियाची ३ मोठी जहाजं देखील उद्ध्वस्त करण्यात युक्रेनला यश आलं आहे.
युक्रेनच्या परराष्ट्र खात्यानं रशियाचं युद्धात नेमकं किती नुकसान झालं याची ही आकडेवारीच ट्विटरच्या माध्यमातून जारी केली आहे. रशियाचे एकूण ६४ एमएमआरएस देखील उद्ध्वस्त झाले आहेत. तेल वाहून येणारे एकूण ६० टँकर देखील उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
रशियाचे एकूण १५० तोफखान्याचे तुकडे नष्ट करण्यात युक्रेनी सैन्याला यश आलं आहे. याशिवाय रशियाची ३६ अँटी एअरक्राफ्ट वेल्फेअर सिस्टम देखील उद्ध्वस्त झाली आहेत.
रशियाचे एकूण ९ यूएव्ही म्हणजेच ड्रोन्स पाडण्यातही युक्रेनला यश आलं आहे. रशियाचं युद्धात झालेलं हे नुकसान यापेक्षाही अधिक असण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत समोर आलेली माहिती युक्रेननं जारी केली आहे.
दोन्ही देशांमध्ये युद्ध विरामाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत चार बैठका झाल्या आहेत. पण त्यात कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही.
रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार संघर्ष सुरु असून युक्रेनवर हल्ला प्रकरण पुतीन यांना चांगलेच भारी पडले आहे. युद्ध एवढा काळ लांबेल असे कोणालाही वाटले नव्हते. युक्रेनचे सैन्य आणि नागरिक त्वेषाने लढा देत आहेत. यामुळे आणखी काही काळ हे युद्ध असेच सुरु राहणार आहे. रशियाला दारुगोळ्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे.
युक्रेनमध्ये हल्ले कमजोर होऊ लागल्याने रशियाने चीनकडे मदत मागितली होती. यावर चीनने रशियाला पैसा आणि शस्त्रास्त्रे पुरविण्यास होकार दिला आहे. अमेरिकेने चीनला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. तरी देखील चीनने रशियाला मदतीचा हात पुढे केल्याची माहिती समोर आली आहे.