Russia Ukraine War: युक्रेनचा मोठा दावा! पुतीन यांच्याशी बोलल्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्र्यांना हृदयविकाराचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 04:21 PM2022-03-26T16:21:59+5:302022-03-26T16:33:48+5:30

Ukraine Russia Crisis: रशिया आणि युक्रेनमध्ये महिनाभरापासून युद्ध सुरू आहे. दरम्यान, रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या जोरदार वादानंतर रशियाचे संरक्षण मंत्री सेर्गेई शोईगु यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा युक्रेनचे मंत्री अँटोन गेराश्चेन्को यांनी केला आहे. पुतिन यांनी युक्रेनमधील त्यांच्या विशेष लष्करी ऑपरेशनच्या अपयशासाठी त्यांच्यावर आरोप केला.

युक्रेनच्या मंत्र्याने दावा केला आहे की युद्धाचे दुसरे सूत्रधार मानले जाणारे संरक्षण मंत्री 11 मार्चपासून सार्वजनिक ठिकाणी दिसून आलेले नाहीत. 24 मार्च रोजी रशियन संरक्षण मंत्री टेलिव्हिजनवर दिसले होते. मात्र, हे फुटेज नवं आहे की जुनं हे कळू शकलेलं नाही.

रशियन संरक्षण मंत्री अचानक बेपत्ता झाल्यानंतर विविध प्रकारच्या अफवांना जोर आला आहे. असे म्हटलं जातं की क्रेमलिनने (रशियन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय) खारकिव्ह किंवा कीव्ह सारख्या प्रमुख युक्रेनियन शहरांना अद्याप ताब्यात न घेतल्याबद्दल शिक्षा केली आहे. गार्डियनच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की पत्रकारांनी संरक्षण मंत्र्याबद्दल प्रश्न विचारल्यावर पुतीन यांच्या कार्यालयानं दैनिक पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला.

रिपोर्टनुसार, पुतीन यांच्या कार्यालयातील प्रवक्त्यानं सांगितले की, संरक्षण मंत्री एका विशेष लष्करी ऑपरेशनमध्ये व्यग्र आहेत आणि माध्यमांसमोर येण्यासाठी ही योग्य वेळ नाही. त्यानंतर लगेचच, संरक्षण मंत्री पुतिन यांच्यासोबतच्या सुरक्षा परिषदेच्या टेलिकॉन्फरन्समधील क्लिपमध्ये संरक्षण मंत्री टेलिव्हिजनवर दिसले.

या क्लिपमध्ये संरक्षण मंत्री विशेष लष्करी ऑपरेशनमध्ये प्रगती केल्याची माहिती देताना दिसत आहेत. गेल्या महिन्याच्या २४ तारखेला रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता आणि युक्रेन आजही लढा देत आहे. ज्याची रशियाला अजिबात अपेक्षा नव्हती.

सीएनएनने फुटेजवर संशय व्यक्त केला होता. "शोइगु दुसऱ्या ठिकाणाहून युक्रेनमधील लष्करी कारवाईबाबत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला माहिती देत ​​होते"

प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये शोइगु बोलताना दिसत नाहीत. पुतीन यांना युद्धाची माहिती देणार्‍या इतर लोकांप्रमाणेच या व्हिडिओ कॉलमध्ये त्यांचा फक्त फोटो दिसत होता.

युक्रेनमधील चार लाखांहून अधिक नागरिकांना पकडून बळजबरीने रशियामध्ये नेण्यात आल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. त्यामध्ये ८४ हजार मुलांचा समावेश आहे. युक्रेनने शरणागती पत्करावी म्हणून रशिया ही कुटिल कृत्ये करीत असल्याचा दावा युक्रेनच्या जेलेन्स्की सरकारने केला आहे.

युक्रेनच्या दोन फुटीरतावादी प्रांतांच्या स्वातंत्र्याला मान्यता देऊन रशियाने या देशावर २४ फेब्रुवारी रोजी आक्रमण केले. त्यानंतर युक्रेनमधील कीव्ह, लविव्ह, मारियुपोल अशा अनेक शहरांवर रशियाने हल्ले चढविले. युक्रेनला हरप्रकारे नमविण्याचा रशिया प्रयत्न करीत आहेत.