Russia-Ukraine War : पुतीन यांच्या ट्रॅपमध्ये फसली अमेरिका? युद्धात उतरणंही मुश्किल अन् वाचणंही कठीण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 04:00 PM2022-02-24T16:00:08+5:302022-02-24T16:08:03+5:30

रशियाने गुरुवारी सकाळी अचानकच हल्ल्याची घोषणा करत संपूर्ण जगाला धक्का दिला...

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने सांगत होते की, आमचा युक्रेनवर हल्ला करण्याचा कोणताही इरादा नाही. मात्र त्यांनी गुरुवारी सकाळी अचानकच हल्ल्याची घोषणा करत संपूर्ण जगाला धक्का दिला.

पुतीन यांच्या घोषणेनंतर, काही तासांतच रशियन सैन्याच्या हल्ल्यात यूक्रेनचे अनेक एयरबेस आणि एयर डिफेंस उद्धवस्त झाले आहेत. मात्र, रशियाला वारंवार परिणामांची धमकी देणाऱ्या अमेरिकेने प्रत्युत्तरादाखल अद्याप कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केलेली नाही.

रशियाने हल्ल्याला सुरुवात केल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रापती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी लगेचच अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

फोनवर बोलताना अमेरिकन राष्ट्रपती बायडेन यांनी, झेलेन्स्की यांना, आपल्याकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरूच राहील, असे आश्वासन दिले. मात्र, अमेरिका अथवा नाटोचे सैन्य यूक्रेनमध्ये पाठविण्यासंदर्भात कसल्याही प्रकारचे भाष्य केले नाही.

अशा परिस्थितीत, अमेरिका पुतीन यांच्या रणनतीत अडकली आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाला उत्तर देताना माजी डिप्लोमॅट विवेक काटजू यांनी एका वाहिनीशी बोलताना, अमेरिका निश्चितपणे अडकली असल्याचे म्हटले आहे.

काटजू म्हणाले, 'अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडेन हे फारसे मजबूत नेते नाहीत. तसेच, फ्रान्सचे पाष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हेही फार मजबूत नेते म्हणून ओळखले जात नाहीत. याशिवाय, जर नाटोचे सैन्य युद्धात उतरले, तर त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. एवढेच नाही, तर ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवातही असू शकते.' यामुळे, अमेरिकेसह अनेक नाटो देश युद्धात भाग घेणे टाळत आहेत.

पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्यासाठी परफेक्ट वेळ निवडली - काही परराष्ट्र विषयक धोरणातील जानकारांच्या मते, व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्यासाठी अगदी परफेक्ट वेळ निवडली आहे. कारण, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी घेतल्यापासूनच ज्यो बायडेन घेरले गेले आहेत. तसेच, अमेरिका पूर्वीप्रमाणे आर्थिकदृष्ट्या महासत्ताही राहिलेली नाही आणि रशियासोबत असलेल्या संबंधांमुळे चीन आणि भारतानेही तटस्त राहणेच पसंत केले आहे.

आशिया खंडात रशियाचा रुतबा - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान तर रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरू असतानाच रशियात पोहोचले आहेत. यावरून आशियन देशांमध्ये रशियाचा काय रुतबा आहे हेही स्पष्ट होते. याशिवाय, अमेरिका, नाटो देश आणि यूरोपियन यूनियनने लादलेले निर्बधही रशियाला युद्धापासून रोखू शकले नाहीत. कारण, ज्या वस्तूंसाठी रशिया या देशांवर अवलबून आहे, त्याची भरपाई करण्यासाठी चीन त्याच्यासोबत उभा आहे.