Vladimir Putin Daughter Maria News: पुतीन यांना आजवरचा जबर धक्का! मोठ्या मुलीचा संसार मोडला; डच उद्योगपतीकडून डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 03:37 PM2022-03-23T15:37:48+5:302022-03-23T16:01:08+5:30

Maria Vorontsova, Putin's Daughter Marriage Collapse: पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करून आपल्याच मुलीचा संसार उद्ध्वस्त केला आहे. पुतीन यांना दोन मुली आहेत. डच उद्योगपतीने मारियाला डच्चू दिला आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केला, लाखो संसार उद्ध्वस्त केले. याची झळ आता महिन्याभरातच त्यांच्या कुटुंबाला सोसावी लागली आहे. जगाने रशियावर निर्बंध लादलेले असताना पुतीन यांची मोठी मुलगी डॉ. मारिया वोरन्तसोवा (36) हिचे लग्न मोडले आहे. डच उद्योजक असलेल्या पतीने तिला डच्चू दिला आहे.

याचबरोबर मारिया वोरन्तसोवा (Maria Vorontsova) चे अतिश्रीमंत परदेशी नागरिकांसाठी एलीट मेडिकल सेंटर खोलण्याचे स्वप्नदेखील भंगले आहे. मारियाला दोन मुले आहेत. मारिया ही लहान मुलांमधील दुर्लभ जेनेटीक आजारांवर उपचार करणारी डॉक्टर आहे. पुतीन जेव्हा केजीबीचे गुप्तहेर होते तेव्हा मारियाचा जन्म झाला होता.

रशियाचे पत्रकार सर्गेई कानेव यांनी हा दावा केला आहे. पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करून आपल्याच मुलीचा संसार उद्ध्वस्त केला आहे. रशियावर पश्चिमी देशांनी कठोर प्रतिबंध लादले आहेत. सेंट पीटर्सबर्गजवळ सुपर मॉडर्न मेडिकल सेंटर बांधण्याच्या मेगा प्रोजेक्टमध्ये पुतीन यांच्या मुलीचा मोठा वाटा आहे, असेही कानेव यांनी म्हटले आहे.

पुतीन यांच्या मुलीने युरोपातील रुग्ण आणि आखाती देशांतील श्रीमंत शेखांना उपचारासाठी रशियात आकर्षित करण्याची योजना आखली होती. परंतू आता युक्रेनवरील हल्ल्यानंतर युरोप आणि शेख लोक रशियाला कसे येतील? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुतीन यांच्या मोठ्या मुलीच्या पतीचे नाव जोरीट फासेन आहे. पती-पत्नी कधी वेगळे झाले हे रिपोर्टमध्ये सांगितलेले नसले तरी युद्ध सुरू झाल्यापासूनच्या काळात ते वेगळे झाले असल्याचे समजते. त्यांच्या मुलांचे तपशील सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. फासेनने रशियात दीर्घकाळ काम केल्याचे सांगितले जाते. त्याचे वडील डच सशस्त्र दलात कर्नल होते.

पुतिन यांच्या या डच जावयाने एकदा सांगितले होते की त्याने एका रशियन महिलेशी लग्न केले आहे आणि त्यांना दोन मुले देखील आहेत. मारिया तिच्या आजीचे आडनाव वोरोंत्सोवा वापरते. ती रशियन आरोग्य मंत्रालयाच्या नॅशनल मेडिकल रिसर्च सेंटर फॉर एंडोक्रिनोलॉजीचे प्रमुख संशोधक आहे.

गेल्या वर्षी, तिची मुलाखत एका चॅनेलवर प्रसारित झाली ज्यामध्ये तिने मुलांमधील दुर्मिळ आजाराबद्दल माहिती दिली परंतु पुतिन यांची मुलगी म्हणून तिने तिची ओळख उघड केली नाही.

जगात कोरोना पसरला तेव्हा रशियाने पहिली लस तयार केल्याचा दावा केला होता. त्यावेळी पुतिन यांनी सांगितले होते की, त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लस देण्यात आली आहे. व्लादिमीर पुतिन यांना दोन मुली आहेत. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जगाला फारच कमी माहिती आहे.

मारिया पुतीन आणि येकातेरिना पुतीन अशी त्यांच्या मुलींची नावे मीडियात आहेत. सर्वात मोठी मुलगी मारिया वोरोंत्सोवा म्हणूनही ओळखली जाते. ती डॉक्टर आहे. तर धाकटी मुलगी अॅक्रोबॅटिक डान्सर आहे. दोन्ही मुलींनी त्यांच्या नावातील वडिलांचे आडनाव वगळले आहे.