Bhawani Mandi Railway Station: देशातील एकमेव रेल्वे स्टेशन, अर्धा भाग राजस्थान तर अर्धा भाग मध्य प्रदेशात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 03:32 PM2022-02-21T15:32:55+5:302022-02-21T15:36:21+5:30

Bhawani Mandi Railway Station: तिकीट घ्यावं लागतं मध्य प्रदेशातून अन् ट्रेनमध्ये बसण्यासाठी जावं लागतं राजस्थानमध्ये

तुम्ही अनेकदा दोन राज्यांच्या सीमा पाहिल्या असतील. अनेकवेळा या सीमा शेत किंवा कोणाच्यातरी घरातून जातात. पण, देशात असे एक रेल्वे स्टेशन आहे, ज्यातून दोन राज्यांच्या सीमा गेल्या आहेत. दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर 'भवानी मंडी' नावाचे एक रेल्वे स्टेशन आहे.

भवानी मंडी रेल्वे स्टेशनची महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील एक प्लॅटफॉर्म राजस्थानमध्ये आणि दुसरा प्लॅटफॉर्म मध्य प्रदेशमध्ये आहे. हे स्टेशन झालावाड जिल्हा आणि राजस्थानच्या कोटा विभागात येते. भवानी मंडी रेल्वे स्टेशन राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये विभागले गेले आहे.

विशेष म्हणजे हे रेल्वे स्टेशन अतिशय लहान आहे, स्टेशनमध्ये ट्रेन आल्यावर ट्रेनचे इंजिन राजस्थानमध्ये आणि ट्रेनचा गार्ड डब्बा मध्य प्रदेशात उभा राहतो.

दोन राज्यांत विभागलेले हे देशातील एकमेव रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनच्या एका टोकाला राजस्थानचा बोर्ड लावला आहे, तर दुसऱ्या टोकाला मध्य प्रदेशचा बोर्ड लावला आहे.

या रेल्वे स्टेशनची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील बुकिंग काउंटर मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात आहे तर स्टेशनच्या आत प्रवेश करण्याचा मार्ग राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात आहे.

इथे तिकिटांच्या रांगा मध्य प्रदेशातून सुरू होतात आणि राजस्थानपर्यंत अनेक लोक उभे असतात. येथील प्रशासकीय यंत्रणाही अतिशय मजेशीर आहे. रेल्वे स्थानकावर कोणतीही घटना घडल्यास त्या त्या राज्यातील पोलिसांकडून त्याची दखल घेतली जाते.

इथल्या प्लॅटफॉर्मवर जवळचे तिकीट घेणारे प्रवासी राजस्थानात उभे असतील तर तिकीट देणारे अधिकारी मध्य प्रदेशात बसलेले असतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, मध्य प्रदेशातील भैंसोडमंडी शहरात भवानी मंडी शहराच्या सीमेवर घरेही दोन राज्यात विभागले गेले आहेत. घराची पुढची दारं मध्य प्रदेशातील भैंसोडमंडी शहरात उघडतात तर मागची दारं झालावाडच्या भवानी मंडईत घडतात.