घंटा वाजताच माकड शाळेत घुसले, काहींना चावले, डोक्यावर बसले, प्राचार्यांच्या खुर्चीवरही केला कब्जा By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 01:38 PM 2021-07-27T13:38:23+5:30 2021-07-27T13:43:47+5:30
Jara hatke: येथे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक शाळेत आले होते. मात्र त्यांचासोबत माकडांची एक टोळीही शाळेत पोहोचली. या माकडांनी शाळेत भरपूर धुमाकूळ घातला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. मध्य प्रदेशमध्ये सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र शाळा सुरू झाल्यावर ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा येथे सरकारी बालक हायर सेकंडरी शाळेमध्ये वेगळेच चित्र दिसून आले. येथे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक शाळेत आले होते. मात्र त्यांचासोबत माकडांची एक टोळीही शाळेत पोहोचली. या माकडांनी शाळेत भरपूर धुमाकूळ घातला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्यांचे चांगलेच मनोरंजन झाले.
माकडांच्या या टोळीमध्ये असलेल्या लहान माकडांनी तर थेट प्राचार्यांच्या खुर्चीवरच कब्जा केला. तर काही माकड शाळेतील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर नाचताना दिसत होते. यावेळी काही मोठ्या माकडांनी तिथे असलेल्या काही लोकांचा चावाही घेतला. माकडांची ही टोळी शाळा, जनपद भवन आणि बीआरसी ऑफिसमध्ये नेहमीच धुमकूळ घालत असतात.
दीर्घ काळानंतर ११वी आणि १२वीचे वर्ग सुरू झाल्यावर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांचे पालक शाळेत पोहोचले होते. शाळा सुरू होताच येथे पाच-सहा माकडांची टोळी पोहोचली. यातील लहान माकडांनी प्राचार्यांच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा घाबरलेल्या प्राचार्यांनी भीतीने खुर्ची सोडून पळ काढला. तेव्हा लहान माकडांनी प्राचार्यांच्या खुर्चीवर कब्जा केला.
याशिवाय माकडांनी वर्गांमध्येही घुसखोरी करून तिथे शिकवत असलेल्या शिक्षकांच्या डोक्यावर चढून नाचण्यास सुरुवात केली. दरम्यान प्राचार्य कमल किशोर श्रीवास्तव यांनी माकडांना पकडण्यासाठी वनविभागाशी संपर्क साधला आहे.
माकडांच्या या टोळीतील मोठ्या माकडांना पळवण्याचा प्रयत्न केल्यास ते आक्रमक होतात आणि हल्ला करतात. यादरम्यान, एका विद्यार्थ्यांने माकडाला पळवण्याचा प्रयत्न केला असता माकडाने त्याला चावा घेतला. तसेच या विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या एका पालकाचाही माकडाने चावा घेतला. मात्र त्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांनी या माकडांना कसेबसे पळवून लावले.
दरम्यान, स्थानिकांनी सांगितले की, डबरा येथील एका शाळेसोबतच बीआरसी ऑफीस आणि जिल्हा कार्यालयामध्येही माकडांची ही टोळी गोंधळ घालते. शाळेच्या कर्मचाऱ्यांसोबत विद्यार्थ्यांनी सांगितले की, माकडांची ही टोळी शाळेमध्ये नेहमीच येते. तसेच इथे येऊन धुमाकूळ घालण्यासोबतच चावा घेऊन जखमी करतात. त्यामुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.