काम असं करा की...! शासकीय अधिकाऱ्याची बदली अन् लोक भावुक; राजासारखा दिला निरोप By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 04:49 PM 2023-08-06T16:49:57+5:30 2023-08-06T16:52:20+5:30
मध्य प्रदेशात शासकीय अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर लोक भावुक झाले अन् त्यांनी राजासारखा निरोप दिला. 'सरकारी काम दहा महिने थांब', असे प्रामुख्याने म्हटले जाते. त्यामुळे अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांबद्दल लोकांमध्ये तिरस्कार असतो. समोरचा अधिकारी कसाही असला तरी सरकारी अधिकारी काम करत नाहीत, असा भ्रम लोकांमध्ये पसरल्याचे दिसते. पण, मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. इथे अधिकाऱ्यांची बदली झाल्यावर लोक भावुक झाले अन् त्यांनी राजासारखा निरोप दिला.
स्थानिकांनी ढोल वाजवून अधिकाऱ्याला निरोप दिला. भिंड येथील उपविभागीय दंडाधिकारी शुभम शर्मा यांची गोहड येथून बदली करण्यात आली आहे. ही बाब शहरात पसरताच काही वेळातच लोक त्यांच्याभोवती जमा झाले. इथून जाऊ नका म्हणत लोकांनी त्यांना आग्रह केला. परंतु, सरकारी आदेशाचा हवाला देत शर्मा यांनी बदली टाळता येणार नसल्याचे सांगितले.
आपला लाडका अधिकारी शहराचा निरोप घेत असल्याचे कळताच लोकांनी घाईघाईने त्यांच्या निरोपाची तयारी केली. लोकांनी एसडीएम शुभम शर्मा यांना फेटा बांधून रथावर बसवले. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. लोकांनी थाटामाटात त्यांना निरोप दिला. तसेच त्यांना चांदीची शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला.
शर्मा यांनी चार वर्ष सेवा केल्यानंतर त्यांची बदली झाली. सरकारने त्यांना आता सेवेसाठी मुरैना येथे धाडले आहे. शर्मा यांनी गोहडमध्ये जनतेसाठी इतकी कामे केली आहेत की, ते इथल्या प्रत्येक घराघरात ओळखले जातात. एखाद्या चित्रपटातील हिरोप्रमाणे शर्मा जेव्हा बाजारात जायचे तेव्हा लोक त्यांना घेरायचे. शर्माही त्यांचे म्हणणे ऐकून त्यावर तोडगा काढत असत.
गोहाड रोडवर असलेल्या एका बागेत निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शर्मा म्हणाले की, माझ्या कृतीतून, शब्दांतून, कोणाच्या भावना दुखावल्या असतील किंवा कोणाप्रती काही वाईट निघाले असेल तर मला माफ करा.
तसेच देशातील इतर अधिकाऱ्यांना सल्ला देताना शर्मा यांनी म्हटले, "शासनाच्या तक्रार निवारण धोरणानुसार सेवक बनून जनतेत सामील व्हा आणि पूर्ण प्रामाणिकपणे काम करा. प्रामाणिकपणा माणसाला मोठ्या उंचीवर घेऊन जातो."