वादग्रस्त प्रवास! उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा, कॉंग्रेसमध्ये प्रवेश अन् तिकिटही मिळालं नाही By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 04:41 PM 2023-10-26T16:41:58+5:30 2023-10-26T16:51:55+5:30
MP Election 2023, nisha bangre : निशा बांगरे विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या पण कमलनाथ यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. मध्य प्रदेशमधील माजी उपजिल्हाधिकारी निशा बांगरे या त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे चर्चेत आल्या अन् त्यांची ही अनोखी प्रसिद्धी आजतागायत कायम राहिली आहे. खरं तर धार्मिक कार्यासाठी सुट्टी नाकारल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्या मध्य प्रदेशातील छतरपूर येथे कार्यरत होत्या.
निशा बांगरे यांनी आपला राजीनामा २२ जून २०२३ रोजी प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे पाठवला होता. त्यांना आंतरराष्ट्रीय सर्वधर्म शांती परिषद आणि जागतिक शांतता पुरस्कार समारंभ तसेच २५ जून रोजी त्यांच्या घराच्या गृहप्रवेशासाठी जायचे होते. पण सरकारने परवानगी नाकारली अन् त्यांनी थेट राजीनामा देऊन खळबळ माजवली .
उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगरे यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसचा 'हात' धरला. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांनी बांगरे यांचे पक्षात स्वागत करून पक्षाचे सदस्यत्व दिले.
लक्षणीय बाब म्हणजे निशा बांगरे विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. किंबहुना त्यांनीच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, कमलनाथ यांनी या चर्चांना पूर्णविराम देत बांगरे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यासाठी त्या उपजिल्हाधिकारी पदाच्या राजीनाम्यावर ठाम राहिल्या.
छिंदवाडा येथे उमेदवारी दाखल केल्यानंतर कमलनाथ यांनी मंचावरून घोषणा केली की, यावेळी निशा बांगरे निवडणूक लढवणार नाहीत. परंतु पक्षाला त्यांची गरज आहे. निशा बांगरे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्ष त्यांना आमला मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकते, अशी अटकळ बांधली जात होती.
बांगरेंनी उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देताना काय म्हटले होते? निशा बांगरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताना पत्राद्वारे आरोप केले होते. ज्यामध्ये त्या म्हणतात, "मला माझ्या घराच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी सुट्टी न मिळाल्याने दुःख झाले. तसेच जागतिक शांततेचे दूत तथागत बुद्ध यांच्या अस्थिकलशाचे दर्शन मला घेऊ न दिल्यामुळे माझ्या धार्मिक भावनांना कधीही भरून न येणारी हानी पोहोचली."
तसेच माझे मुलभूत हक्क, धार्मिक श्रद्धा आणि घटनात्मक मूल्यांशी तडजोड करून उपजिल्हाधिकारी पदावर राहणे मला योग्य वाटत नाही. म्हणूनच मी आज २२-६-२०२३ रोजी तात्काळ उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देत आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले होते.
दरम्यान, बांगरे यांनी राजीनामा देऊन बराच काळ लोटला तरी सरकारने त्याचा स्वीकार केला नव्हता. यावरून सरकारवर आरोप करताना त्या म्हणाल्या की, निवडणूक लढवता येऊ नये म्हणून सरकारने राजीनामा मुद्दाम स्वीकारला नाही. राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्ष 'आमला' जागेवरून उमेदवार बदलून मला संधी देईल, अशी भीती सत्ताधाऱ्यांच्या मनात होती.
सरकारने बांगरे यांचा राजीनामा स्वीकारण्यास विरोध दर्शवला होता. पण, उच्च न्यायालयाने आदेश जारी केल्यानंतर राजीनामा मंजूर करण्यात आला.
राजीनामा मंजूर झाल्यामुळे निशा बांगरेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र कमलनाथ यांच्या घोषणेनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला.