एकनाथ शिंदेंशिवाय भाजपा सरकार बनवू शकतं, परंतु तसं न करण्यामागची ५ कारणं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 01:51 PM2024-12-03T13:51:20+5:302024-12-03T13:57:51+5:30

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवसांहून अधिक काळ लोटला. निकालात महायुतीला घवघवीत यश मिळालं तरी अद्याप सरकार स्थापन झालं नाही. येत्या ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर नव्या मुख्यमंत्र्‍यांचा शपथविधी होणार आहे. परंतु मुख्यमंत्री कोण याचा सस्पेन्स कायम आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद हवे होते अशी शिवसेनेची मागणी होती. मात्र भाजपा ते द्यायला तयार नाही त्यामुळे गृहमंत्रिपदाची मागणी शिंदेकडून करण्यात आली आहे. त्यावर केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेतील तो मान्य करू असंही शिंदे म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे नाराज आहेत, ते भाजपावर दबाव टाकतायेत अशी चर्चा आहे. भाजपाकडे संख्याबळ असतानाही ते सावध पाऊले का उचलतायेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

फडणवीसांच्या नावावर सहमती नाही? - मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत परंतु अद्याप त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. भाजपाचा मागील इतिहास पाहिला तर ज्या नावाची अधिक चर्चा होते त्यात धक्कातंत्र दिलं जातं. परंतु महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात नव्या चेहऱ्यावर जबाबदारी सोपवणे जोखमीचं असू शकते. फडणवीसांची राजकीय कारकिर्द पाहता त्यांनी पक्षाला दिलेले यश मोठे आहे. परंतु मराठा-ओबीसी वाद पाहता भाजपा सर्व गोष्टीचा विचार करत आहे.

मुंबई महापालिका महत्त्वाची - आशियातील सर्वात मोठं बजेट असणारी महापालिका म्हणून मुंबईकडे पाहिले जाते. मागील ३ वर्ष इथं निवडणूक झाली नाही. मुंबई, ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत शिंदे मुख्यमंत्री हवेत असा तर्क त्यांचा पक्ष देतो. गेल्या ३ दशकापासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरेंचं वर्चस्व आहे. महायुतीचं नेतृत्व एकनाथ शिंदेंच्या हाती असेल तर ठाकरे गटाला मात मिळू शकते असं काही नेत्यांना वाटते.

मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. त्यात महायुतीला २२ जागांवर विजय मिळाला आहे. १५ जागांवर भाजपा आणि ६ जागा शिवसेनेच्या पारड्यात गेल्यात. राष्ट्रवादी अजितदादा गटाने १ जागा जिंकली आहे. मविआत सर्वाधिक १० जागा ठाकरेंना मिळाल्यात. त्यामुळे मुंबई महापालिकेत जिंकायचे असेल तर एकनाथ शिंदेसोबत असणे आवश्यक आहे.

मराठा राजकारण - २ वर्षापासून राज्यात मराठा आरक्षणाचा वाद आहे. मराठा-ओबीसी वादात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांनी कमान सांभाळली. शिंदे हे मराठा समाजाचा चेहरा म्हणून पुढे आलेत. त्यांनी आरक्षणातून होणारी नाराजी मिटवण्यासाठी प्रयत्न केले. निकालात मराठा समाजाने महायुतीच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे एकनाथ शिंदेंना एकदम दूर करणे भाजपाला शक्य नाही. राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक मुख्यमंत्र्‍यांमध्ये १० मराठा आहेत. एकनाथ शिंदेही त्यातील एक आहेत. त्यामुळे मराठा समाजाला थेट दुखावणे भाजपाला अवघड आहे.

अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर वाढण्याची भीती - जर एकनाथ शिंदेंनी महायुतीपासून वेगळा निर्णय घेतला तर अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर वाढण्याची शक्यता आहे. शिंदे वेगळे झाले तर अजित पवार हे भाजपासाठी आवश्यक होतील. शिंदे सोबत असल्याने अजित पवारांची बार्गेनिंग क्षमता कमी आहे.

एकनाथ शिंदे यांचे भाजपाशी चांगले संबंध आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचं काम भाजपा करेल. परंतु अजित पवार यांच्याकडे किंग मेकरची भूमिका आली तर भाजपाला भविष्यात मोठे निर्णय घेण्यास अडचण होईल. त्याशिवाय अजित पवारांचा पूर्वीचा राजकीय इतिहासही भाजपाला माहिती आहे.

अजित पवारांनी सध्या उघडपणे देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे करून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला आहे. परंतु अजित पवारांबाबत संशयाचं भूत कायम आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी समतोल साधूनच भाजपा पुढील सत्तेची गणिते जुळवण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, महायुतीत नाराजीनाट्य नाही. मागणी करणे यात चुकीचे काही नाही. केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल ते मान्य करू. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनतील असं जनतेला वाटत होते. आम्ही मागणी केली, परंतु ते होत नाही. त्यामुळे त्यांनी केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य करण्याचं ठरवलं. आम्ही सगळे अधिकार एकनाथ शिंदेंना दिलेत, ते जे काही ठरवतील आम्ही त्याचे पालन करू असं शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी सांगितले.