देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट अन् अजित पवारांचं मौन; राजकीय चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 07:12 PM2023-02-16T19:12:57+5:302023-02-16T19:16:40+5:30

२०१९ च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं दिसून आले. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले आणि सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपाला विरोधात बसवले.

विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेनेत बिनसलं. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी शिवसेना आग्रह धरला परंतु भाजपानं असं काही ठरले नव्हते सांगितले. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करत महाविकास आघाडी स्थापन केली

पण या सत्तासंघर्षात लक्षवेधी ठरला तो म्हणजे पहाटेचा शपथविधी, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी राजभवनात पहाटे शपथ घेतली त्यावरून राजकीय भूकंप झाला होता.

राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या या घटनेबद्दल आजही विविध तर्कवितर्क लढवले जातात. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांच्या चर्चेनंतरच झाला होता असं विधान केल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते अशी शक्यता वर्तवली होती. त्यात शरद पवारांची चर्चा केल्यानंतर भाजपा-राष्ट्रवादी सरकार बनवण्यात आले असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितले.

फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादी नेत्यांनी फडणवीसांवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली. फडणवीस हे सुसंस्कृत नेते आहेत त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं सांगत खुद्द शरद पवार यांनी या विधानावर प्रतिक्रिया दिली.

मात्र पहाटेच्या शपथविधीतील प्रमुख चेहरा असलेले अजित पवार यांनी मात्र या घटनेवर बोलणं टाळलं. मी पहाटेच्या शपथविधी सोहळ्यावर योग्यवेळी बोलेन असं मागे म्हटलं होते. त्यामुळे मला आता यावर काहीच बोलायचं नाही असं सांगत अजित पवारांनी फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर मौन बाळगलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, अजित पवार आमच्यासोबत आलेले ते फसवणुकीच्या भावनेतून आले नव्हते. त्यांनी प्रामाणिक भावनेतून ती शपथ घेतली होती. ठरल्यानंतर काय गोष्टी बदलल्या हे कधीतरी अजित पवार तुम्हाला सांगतील पण नाहीच सांगितले तर मी पुढे सांगेन असं म्हटलं.

तर पत्रकारांनी याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला तेव्हा अजित पवार म्हणाले की, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा मी सर्व माध्यमांसमोर महाराष्ट्रातील जनतेला सांगितले होते मी या विषयावर बोलणार नाही. मी ज्यावेळी माझ्या मताशी ठाम असतो. बाकींच्यांबद्दल मला बोलायचे नाही असं त्यांनी म्हटलं.

राज्यात कसबा-चिंचवड पोटनिवडणूक सुरू आहे त्यात भाजपाने दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. यात कसबाला काँग्रेस तर चिंचवडला राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले आहेत. अशावेळी पहाटेच्या शपथविधीवर झालेल्या विधानावरून राजकीय कुरघोडींना वेग आला आहे.