देवेंद्र फडणवीस पुन्हा घेणार अजित पवारांची जागा? चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 11:52 AM 2022-08-11T11:52:53+5:30 2022-08-11T11:56:08+5:30
राज्यातील सत्तांतरानंतर भाजपा-शिंदे गटाचं सरकार महाराष्ट्रात आले. याठिकाणी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली तर अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सत्तेत परत आले. राज्यात सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेच्या खेळीमुळे भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं होते. त्यात मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणारे देवेंद्र फडणवीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीसांसोबतच ८० तासांचं सरकार बनवणारे अजित पवार हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय झाले. अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची धुरा देण्यात आली. मविआ सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादीला बळ देण्याचं काम अजित पवारांनी केले. त्याचसोबत पुणे, पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून पुण्याची जबाबदारी घेतली होती.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पुन्हा भाजपा सरकारमध्ये आली. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांची जागा घेतली. आता याचसोबत आणखी एकदा फडणवीस अजित पवारांची जागा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा वाढता प्रभाव पाहता देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचं पालकमंत्रिपद घ्यावं अशी मागणी सातत्याने भाजपा कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे.
भाजपा कार्यकर्त्यांच्या याच मागणीला दुजोरा देत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात सूतोवाच केले आहे. पुण्यातील एका शिष्टमंडळाला भेट देताना पाटलांनी तुम्ही आता पुढे व्हा अन् तुमच्या पालकमंत्र्यांशी बोलून घ्या असं सांगत फडणवीसांकडे इशारा केला. ते पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पुण्यात अजित पवारांचा दबदबा आहे. त्यालाच सुरुंग लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार हे आता जवळपास निश्चित असल्याचं बोलले जात आहे.
अलीकडेच पुण्यातीलच एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने याला दुजोरा दिला. आधीचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार होते. आताच्या सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनीच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होणे योगायोग साधल्यासारखे होईल असे मजेने सांगत या कार्यकर्त्यांनी पुणे महापालिका निवडणूक, पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असे मुद्दे फडणवीस यांच्यापुढे मांडले. तेव्हा ‘बरोबर आहे तुमचे’ अशा अर्थाने नेहमीसारखी मान हलवत त्यांनी मूक संमती दिली, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोल्हापूरहून पुण्यात आलेले व कोथरूड मतदारसंघातून आमदार झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अजूनही पुण्यात चाचपडत आहेत. त्यांना जिल्ह्याने किंवा पुणे शहरानेही स्वीकारलेले दिसत नाही. त्यामुळेच भाजपाच्या पुणे गोटातही पाटील यांच्याबद्दल नाराजीचा सुप्त प्रवाह आहेच. पुणे शहरावरचे वर्चस्व कमी केले म्हणून खासदार गिरीश बापट हेही पाटील यांच्या विरोधातच असल्याचे दिसते. त्यामुळेच फडणवीस यांना पुण्याचे पालकमंत्री होण्याबाबत आग्रह केला जात आहे.
पुणे शहरातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहेत. मागील विधानसभेत तर सर्वच जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. त्यावेळी विद्यमान खासदार गिरीश बापट यांना कॅबिनेट मंत्रीपद शिवाय पुण्याचे पालकमंत्री पद दिले गेले होते. बापट खासदार झाल्यावर पुण्याचे पालकमंत्रीपद कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांना दिले गेले. त्यानंतर पाटील यांना पक्षाकडून थेट पुण्यातच बसवण्यात आले. कोथरूड विधानसभेतून त्यांना उमेदवारी देण्यात आली
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस एकाच दिवशी २२ जुलैला असतो. या दोघांचा स्वभाव, राजकारणाची पद्धत आणि कार्यशैली भिन्न असली तरी दोघंही एकमेकांशी चांगले संबंध टिकवून आहेत. २०१९ च्या निकालानंतरच्या राजकारणात अजित पवार-देवेंद्र फडणवीस या दोघांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी आजही लोकांच्या स्मरणात आहे. फडणवीस-अजितदादांचे सरकार फार काळ टिकले नाही मात्र दोघांमधील संबंध आजही कायम आहेत.