शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 03:10 PM 2024-11-21T15:10:48+5:30 2024-11-21T15:22:48+5:30
Maharashtra Election Result Prediction: महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी २८८ पैकी १४५ जागा जिंकणे महत्वाचे आहे. २३ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजल्यानंतर आकडे फिरणार... महाराष्ट्रात काय होणार? ज्योतिषाचार्यांचे मोठे भाकीत... महाराष्ट्राच्या नव्या सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. २३ नोव्हेंबरला मतमोजणी असणार आहे. कोणाचे सरकार येणार, कोणाला बहुमत मिळणार की त्रिशंकू सरकार चालवावे लागणार, कोणाचा टेकू घ्यावे लागणार यावरून वेगवेगळे आखाडे बांधले जात आहेत. १० पैकी सहा एक्झिट पोल हे महायुतीच्या बाजुचे आहेत. अशातच ज्योतिषशास्त्राने यात उडी घेतली आहे. शनिवारीच मतदान होणार असल्याने कोणाची साडेसाती कोणाला फळणार याचा अंदाज देण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये चित्रकुटचे आचार्य राजेश महाराज यांची भविष्यवाणी छापण्यात आली आहे. यानुसार महायुतीची शनिवारी साडेसाती आहे, असे सांगण्यात आले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या बाजुने ग्रह-तारे आहेत, असे भाकीत करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी २८८ पैकी १४५ जागा जिंकणे महत्वाचे आहे.
२३ नोव्हेंबरला निकालाच्या दिवशी ग्रहांची अशी स्थिती आहे की ते आघाडीच्या बाजुने आहेत. यानुसार बहुमतापासून १५ जागा प्लस मायनस होऊ शकतात परंतू अटीतटीच्या लढती होणार असल्याचे आचार्य राजेश महाराज यांनी भाकीत केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी २९ जून २०२२ ला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता तो दिवस आर्द्रा नक्षत्र अमावास्येचा होता. तर एकनाथ शिंदेंनी ३० जून २०२२ ला शपथ घेतली होती. तेव्हा पुनर्वसु नक्षत्र होते. जेव्हा एकाच नक्षत्राची पुनरावृत्ती होते तेव्हा तो व्यक्ती पदच्युत होतो. यामुळे शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असे आचार्यांनी म्हटले आहे.
तर महायुतीतील भाजपाचा चेहरा देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या ग्रह स्थितीनुसार २३ नोव्हेंबरला मधा नक्षत्र आणि सिंह राशी आहे. फडणवीसांनी जेव्हा २३ नोव्हेंबर २०१९ ला पहाटेची शपथ घेतलेली तेव्हा कन्या राशी आणि आर्द्रा नक्षत्र होते. यामुळे त्यांची खुर्ची लगेचच गेली. त्याच नक्षत्राचा पुन्हा योग बनत आहे, त्यामुळे फडणवीसांचा राजयोग भंग होत आहे, असे आचार्यांनी भाकीत केले आहे.
एकनाथ शिंदेंच्या पक्षाला ३० ते ३५ जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. तर फडणवीसांचा मार्गी शनी, सूर्य ग्रहदृष्टी फडणवीसांना सत्तेतून जाण्याचे संकेत देत आहे.
मविआला किती जागा... काँग्रेसला ५४ जागा, एनसीपीला ४८ जागा आणि ठाकरे गटाला ५७ जागा मिळण्याचे गहयोग बनत असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. २३ तारखेला मध्यान्ह १३.३० वाजल्यानंतर या आकड्यात बदल होण्याचे संकेत आहेत. जवळपास २० जागांवर हानी होऊ शकते. अशाप्रकारे महाविकास आघाडीच्या १४० जागा येऊ शकतात.
महायुतीला किती जागा... भाजपा प्रणित एनडीएला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये ११३ ते १३० जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्य़ात आला आहे. तसेच आचार्यांनी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला काही गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे.
महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने दह्याच्या पाण्याने अंघोळ करावी, तसेच शंखामध्ये तांदूळ आणि कापूर ठेवावा, असे आचार्यांनी म्हटले आहे.
डिस्क्लेमर: वरील भाकीत हे ज्योतिषशास्त्रावर अवलंबून आहे, लोकमत डॉट कॉम याचे समर्थन किंवा पुष्टी करत नाही.