'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 04:11 PM2024-09-25T16:11:30+5:302024-09-25T16:30:09+5:30

शरद पवारांना दैवत मानत आलोय, हे अजित पवारांनी केलेले विधान सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांची चिंता शरद पवारांनी वाढवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने सु्प्रीम कोर्टाकडे अजित पवारांना नवीन पक्ष नाव आणि चिन्ह देण्याची मागणी केली आहे. याच प्रकरणावरील सुनावणी वेळी 'शरद पवारांना दैवत मानत आलोय', या विधानाकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देत घड्याळ चिन्हही दिले. या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे.

शरद पवारांकडून आता अजित पवारांच्या गटाला देण्यात आलेले घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाव काढून घेऊन नवीन नाव आणि चिन्ह द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती सूर्या कांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयाण यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.

जसे शरद पवार गटाला वेगळे नाव आणि चिन्ह देण्यात आले आहे, तसेच या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या गटाला नाव द्यावे. आम्हाला तातडीने दिलासा द्यावा, अशी विनंती वकिलांनी कोर्टात केली.

अजित पवार गटाकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे नवीन निवडणूक चिन्ह घेण्यासाठी त्यांना निर्देश द्यावे. फक्त या विधानसभा निवडणुकीसाठी, अशी मागणी शरद पवार गटाच्या वकिलांनी कोर्टात केली.

न्यायमूर्ती कांत म्हणाले की, आम्ही दिलेल्या आदेशाचे उल्लंघन झाले, तर कदाचित वेगळा उपाय करता येईल.

यावर शरद पवार गटाचे वकील म्हणाले की, 'काल त्यांनी (अजित पवार) एक विधान केले आहे की, शरद पवार हे त्यांचे दैवत आहे आणि ते एकत्रच आहेत.' अजित पवारांनी केलेल्या विधान सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

या प्रकरणावरील पुढील आता १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सुप्रिया सुळे यांनी असा आरोप केला होता की, शरद पवारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर डावलण्यात आले, अपमान केला. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले होते की, मी कसा अपमान करेन. मी त्यांना दैवत मानत आलो आहे.