महायुती नसल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन B तयार; विधानसभेत भूकंप?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 03:57 PM2024-06-22T15:57:39+5:302024-06-22T16:04:21+5:30

लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीकडून महायुतीला जबर फटका बसला आहे. राज्यातील ४८ पैकी ३१ मतदारसंघात मविआचे उमेदवार जिंकून आले तर महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. महायुतीत भाजपाला ९, शिंदेंच्या शिवसेनेला ७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं.

लोकसभा निकालानंतर महायुतीत आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. त्यात प्रामुख्याने भाजपा-शिवसेनेकडून अजित पवारांना टार्गेट करण्यात येत आहे. त्याला राष्ट्रवादीकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. महायुतीतील या वादात अजित पवारांची कोंडी निर्माण होत असल्याचं दिसून येते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवार महायुतीसोबत राहणार की स्वतंत्र निवडणूक लढवणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अजित पवारांवर होणाऱ्या टीकेवरून राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. अजित पवारांना महायुतीत एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. कुणीही अजितदादांवर बोलावं हे खपवून घेतले जाणार नाही. अजित पवारांनी महायुतीत राहू नये असा काही जणांचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केला.

त्याशिवाय अजित पवार स्वत:हून महायुतीतून बाहेर पडले पाहिजे अशाप्रकारे मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न आहे. परंतु अजित पवारांची बदनामी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस होऊ देणार नाही. काही आमदारांचं म्हणणं महायुतीत लढलं पाहिजे असं आहे. तर काही स्वबळावर लढण्याची भूमिका मांडत आहे असं सांगत राष्ट्रवादी महायुती नसली तर पुढील राजकीय गणित काय असेल याचेही संकेत मिटकरींनी दिले आहेत.

जर ५०-५५ जागांवर राष्ट्रवादीची बोळवण होणार असेल तर स्वतंत्र लढण्याची भूमिका पक्ष घेऊ शकतो. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरचा आहे. पण अजित पवार एकटेच आहेत आणि एकटेच लढतील असं मित्रपक्षांनी समजू नये. राजकारणात काहीही होऊ शकते असं सांगत अमोल मिटकरींनी नव्या राजकीय समीकरणावर भाष्य केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून मी प्रकाश आंबेडकरांना नेहमीच आदर्श मानत आलोय. राजकारणात अजित पवार आदर्श आहेत. भलेही मी वंचित बहुजन आघाडीचा नाही. पण बाबासाहेबांचे वारसदार असलेले प्रकाश आंबेडकर आणि कार्य करणारे अजितदादा ही जोडी महाराष्ट्रात पुढे आली तर यापेक्षा गोड क्षण आमच्यासाठी नसेल. परंतु हे अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर अवलंबून आहे असं अमोल मिटकरी यांनी सांगितले.

आंबेडकरी चळवळ जर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आली तर महाराष्ट्राची दिशा आणि राजकारण फार वेगळे असेल. प्रकाश आंबेडकरांना ज्याप्रकारे महाविकास आघाडीने त्रास दिला, संजय राऊत, नाना पटोले यांनी त्रास दिला, त्यांनी मविआतून निघून जावं यासाठी भाग पाडले. मविआने प्रकाश आंबेडकरांचा वापर करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न प्रकाश आंबेडकरांनी हाणून पाडला. जर अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी खांद्याला खांदा लावून एकत्र लढले तर मग महाराष्ट्रात चित्र वेगळे दिसेल असा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला

तर या दोन्ही नेत्यांमध्ये मी समन्वय साधण्याइतका मोठा नेता नाही. पण मला माझ्या पक्षाने सांगितले तर मी प्रकाश आंबेडकरांच्या घरी वारंवार जाऊ शकतो. मी त्यांना केवळ वंचित बहुजन आघाडीचे नेते म्हणून पाहत नाही तर ते बाबासाहेब आंबेडकरांचे रक्त आहे. त्यामुळे त्यांचा आदर आहे. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील मध्यस्थी होण्याची संधी मला मिळाली तर मी भाग्यवान असेल असंही मिटकरींनी म्हटलं.

प्रकाश आंबेडकरांनी अजित पवारांच्या राजकारणावर बोलताना त्यांच्या पोटात आणि ओठात एकच भूमिका असते असं म्हटलं होतं. दोन्ही नेते डॅशिंग आहेत. दोघेही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आहेत. जर महाराष्ट्रातल्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलवायची असेल, भविष्यात हे दोघे एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण आणि राज्याच्या मंत्रालयावर संविधानाचा ध्वज फडकलेला दिसेल असं मिटकरींनी सांगितले.

दरम्यान, विधानसभा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आहे. तत्पूर्वी हे दोन्ही नेते एकत्र आले पाहिजे ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, पक्षाची नाही असंही अमोल मिटकरींनी स्पष्ट केले. जर दोघे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होईल असंही मिटकरींनी बोलून दाखवले.