शरद पवारांचाच हा डाव? अजितदादांची ताकद वाढत चाललीय, तर उद्धव ठाकरे, भाजपा खूश होतेय By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 02:06 PM 2023-07-23T14:06:49+5:30 2023-07-23T14:12:36+5:30
आधी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्याला वर्ष होत नाही तोच शरद पवारांची राष्ट्रवादी एकाच वाटेवर आहेत. परंतू, राष्ट्रवादीची गोष्ट जरा वेगळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते असे म्हणतात. त्याचीच प्रचिती सध्या महाराष्ट्र, कर्नाटकात य़ेत आहे. ज्या भाजपाने कुमारस्वामींचे सरकार पाडले त्यांच्याच मांडीला मांडी लावून कुमारस्वामी बसणार आहेत. तर महाराष्ट्रात दोन पक्षच भाजपाने आपल्या दावणीला बांधले आहेत. या दोन्ही पक्षांचे अस्तित्व भाजपाने पणाला लावले आहे. आधी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्याला वर्ष होत नाही तोच शरद पवारांची राष्ट्रवादी एकाच वाटेवर आहेत. परंतू, राष्ट्रवादीची गोष्ट जरा वेगळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
एकीकडे एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री पद जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु आहे. काही राजकीय नेते तसे दावे करत आहेत. दुसरीकडे अजित पवार दिवसेंदिवस ताकदवर होत चालले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी कैचीत अडकली असताना काँग्रेस मात्र विधानसभेत आक्रमक होताना दिसत आहे.
एकीकडे अजित पवार शिंदे सरकारसोबत आल्याने इकडे उद्धव ठाकरे गट खुशीत दिसत आहे. कारण वर्षभरापूर्वी ज्यांच्या नावे खडे फोडून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंची खूर्ची हिसकावून घेतली तेच कारण आता शिंदे सरकारमध्ये राज करताना दिसत आहे. अजित पवारांकडे मोठमोठी खाती गेली आहेत. तर शिंदे सरकारकडे मुख्यमंत्री पद आणि काही मोजकी खातीच राहिली आहेत.
एकनाथ शिंदेंवर अपात्रतेची कारवाई होणार का, त्यांचे मुख्यमंत्री पद जाणार का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्याची वाट पाहत आहेत. दुसरीकडे मुंबई आणि दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. परवा शिंदेंना दोन दिवसांत दुसऱ्यांदा दिल्लीला बोलवून घेण्यात आले होते.
एकनाथ शिंदे दिल्लीला जाताच इकडे महाराष्ट्रात अजित पवार मुख्यमंत्री होण्याची गरमागरम चर्चा होऊ लागली आहे. कारण त्यापूर्वीच अजित पवारांनी मोदी आणि शाहंची बैठकी घेतली होती. परंतू, एकही नेता सध्याच्या या चर्चांवर भाष्य करण्याची हिंमत करत नाहीय. एकट्या मिटकरींनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असे म्हटले होते.
अजित पवारांना आणखी एका राज्यातून ताकद मिळाली आहे. नागालँडचे सात आमदार अजित पवार गटात गेले आहेत. यावर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनुसार ही शरद पवारांचीच राजकीय खेळी आहे.
एकीकडे अजित पवारांना ताकदवर बनवायचे, दुसरीकडे शिंदे गटाची ताकद कमी करायची आणि तिसरीकडे आपले महत्व कायम ठेवायचे अशी शरद पवारांची खेळी असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. पवार बंगळुरुला जाण्यापूर्वी तीन दिवस अजित पवार गट त्यांना रोज भेटण्यासाठी जात होता. आशिर्वाद घेत होता, एकजुटीवर मार्गदर्शन मागत होता. यावर पवारांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.
जर शरद पवारांचीच खेळी असेल तर... शरद पवारांचे आता वय झाले आहे, असे अजित पवारच म्हणाले आहेत. त्यांनी आपला राजकीय वारसदार अजित पवारांनाच निवडले आहे. यामुळेच अजित पवार हे शरद पवारांनंतरचे दोन नंबरचे नेते होते. तेच सर्व मतदारसंघ, कार्यकर्ते सांभाळत होते. तर मुलगी सुप्रिया सुळेला त्यांनी दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व दिले होते.
राष्ट्रीय राजकारणात प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीच्या वतीने प्रत्येक गोष्टीत पुढे असायचे, हे पवारांनीच म्हटले आहे. छगन भुजबळ, तटकरे हे सगळे शरद पवारांचे डोळे, नाक, कान आहेत. यामुळे राष्ट्रवादी जर भविष्यात उंचवाय़ची असेल तर शरद पवारांनीच ही खेळी खेळली असल्याचा दावा राजेंद्र निंबाळकर यांनी केला आहे.