पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 04:26 PM2024-10-31T16:26:51+5:302024-10-31T16:36:09+5:30

महाराष्ट्रात मागील ५ वर्षात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्यात. यंदाच्या निवडणुकीत आघाडी, युतीचं स्वरुपही बदललं आहे. भाजपा यावेळी शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अन्य पक्षांना एकत्र करून निवडणूक लढवत आहे. राज्यातील २८८ पैकी १४८ हून अधिक मतदारसंघात भाजपाने उमेदवार उतरवले आहेत.

भाजपाने २०१९ च्या निवडणुकीत १६४ उमेदवार रिंगणात उतरवले. गेल्यावेळच्या तुलनेने यंदा भाजपा १५ जागा कमी लढवत आहे. परंतु पडद्यामागून भाजपा असा डाव खेळत आहे ज्यातून मागील वेळपेक्षाही भाजपा यंदा निवडणुकीत जास्त जागा लढवत असल्याचं दिसून येत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख पूर्ण झाल्यामुळे भाजपप्रणित एनडीए आघाडीतील पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला पाहता कोण किती जागा लढवणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपा १४८ जागा लढवत आहे, त्यांचा मित्रपक्ष शिंदे यांचा शिवसेना ८५ जागांवर तर अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष ५१ जागांवर निवडणूक लढवत आहे. याशिवाय भाजपाने आपल्या कोट्यातील चार जागा महायुतीच्या छोट्या मित्रपक्षांना दिल्या आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेसोबत युती करून निवडणूक लढवली होती. भाजपाने १६४ जागांवर उमेदवार उभे केले होते तर शिवसेनेने १२४ जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी भाजपाने केवळ १४८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत १५ कमी जागा लढवत असलं तरी त्यांनी त्यांच्या १६ नेत्यांना शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली आहे.

भाजपाने आपल्या १६ नेत्यांना वेगळ्या पक्षातून निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे भाजपा २०२४ मध्ये १६४ जागांवर आपले नशीब आजमावत आहे. भाजपा नवीन ट्रेंड फॉलो करत आहे. भाजपाने आपल्या मित्रपक्षांना जागा देऊन सन्मान राखला आहे आणि आपल्या मित्रपक्षांच्या त्या जागांवर आपले नेते उभे करत आहेत. एकीकडे भाजप आपल्या मित्रपक्षांना त्यांच्या इच्छेनुसार जागा देऊन सांभाळत आहे आणि दुसरीकडे त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवून नेत्यांशी समतोल राखत आहे.

भाजपाने दुहेरी खेळ करून महाराष्ट्राची निवडणूक लढविण्याचा डाव आखला आहे. यात त्यांच्या १६ नेत्यांनी त्यांच्या मित्र पक्षाच्या चिन्हावर रिंगणात उतरले आहेत. या १६ मधील १४ नेते शिंदे यांच्या शिवसेनेतून तर ४ नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

कोकणात भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे हे कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. तसेच भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिंदे यांच्या कोट्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आहे.

पालघर विधानसभेची जागा शिंदे यांच्याकडे गेल्याने भाजपा नेते राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे. बोईसर विधानसभेची जागा शिंदे यांच्या कोट्यात आली असून, त्यामुळे भाजपा नेते विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवत आहेत.भिवंडी पूर्वची जागाही शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेली असून, भाजपाचे संतोष शेट्टी यांनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. अंधेरी पूर्वची जागा शिंदे यांच्या खात्यात आली असून त्यामुळे भाजपाचे नेते मुरजी पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणुकीत उडी घेतली आहे. भाजपामधून शिवसेनेत दाखल झालेले अमोल खताळ संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

भाजपच्या प्रवक्त्या आणि नेत्या शायना एनसी यांना मुंबादेवी मतदारसंघातून शिवसेनेने उतरवलं आहे. करमाळ्यात भाजपा नेते दिग्विजय बागल हेही करमाळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. भाजपाचे नेते बळीराम शिरस्कर हेही बाळापूर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर भाजपाच्या चार नेत्यांनी उमेदवारी घेतली आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे दोन वेळा आमदार राहिलेले राजकुमार बडोले यांना रिंगणात उतरवलं आहे. त्याशिवाय भाजपाचे नेते प्रताप पाटील चिखलीकर, निशिकांत पाटील आणि संजय काका पाटील हेही अजित पवारांच्या पक्षाकडून रिंगणात उतरले आहेत.