शिंदे ठाकरेंवर भारी पडणार; पवारांचे काय? विदर्भ, कोकण, महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकणार By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:44 PM 2024-09-10T12:44:26+5:30 2024-09-10T12:54:34+5:30
Maharashtra Assembly Election Survey: ऐन पावसाळ्यात राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून महाराष्ट्राचा सर्व्हे आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर शरद पवार भारी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. येत्या दिवाळीच्या आसपास महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरु होणार आहे. यामध्ये शरद पवार की अजित पवार, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे आणि भाजप की काँग्रेस अशा तुलनात्मक लढाया पहायला मिळणार आहेत. ऐन पावसाळ्यात राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून महाराष्ट्राचा सर्व्हे आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर शरद पवार भारी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
विदर्भातील ६२ जागांपैकी महायुतीला १५-२०, मविआला ४०-४५ आणि इतरांना १-५ जागा मिळण्याची शक्यता आहे. खान्देशातील ४७ जागांपैकी महायुतीला २०-२५, मविआला २०-२५ आणि इतरांना ०-२ जागा मिळण्याची शक्यता आहे.
ठाणे आणि कोकण पट्ट्यातील ३९ जागांपैकी महायुतीला २४-३०, मविआला ५-१० आणि इतरांना १-३ जागा मिळण्याची शक्यता आहे. या पट्ट्यात एकनाथ शिंदे फॅक्टर चालणार आहे तर उद्धव ठाकरे फॅक्टर चालणार नाही.
तर मुंबई पट्ट्यातील ३६ मतदारसंघांपैकी महायुतीला १०-१५, मविआला २०-२५ जागा मिळताना दिसत आहे. इतरांना ०-१ जागा जाणार आहेत. इथे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस फॅक्टर चालणार आहे. मुंबईतील मतदारसंघांत भाजप-शिंदे फॅक्टर फारसा चालणार नाही.
पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार, भाजप वि. शरद पवार अशी लढत होणार आहे. या पट्ट्यातील ५८ जागांपैकी महायुतीला २०-२५ जागा आणि मविआला ३० ते ३५ जागा मिळताना दिसत आहेत. इतरांना १-५ जागा मिळताना दिसत आहेत. तर मराठवाड्यात ४६ जागांपैकी महायुतीला १५-२०, मविआला २५-३० आणि इतर ०-२ जागा मिळताना दिसत आहेत.
लोकपोलच्या सर्व्हेत महाराष्ट्रात सर्वाधिक फटका भाजपला बसताना दिसत आहे. सत्ताविरोधी लाटेचा फटका भाजपला बसत असल्याने नैसर्गिक प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसच्या जागा वाढताना दिसत आहेत. परंतू, काँग्रेसमध्ये प्रचाराचा अभाव आहे, यावर मात केल्यासच काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना सरकारच्या अपयश, विविध समस्यांना लोकांनी जबाबदार धरले आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंची लोकप्रियता वाढत आहे. ग्रामीण दुरवस्था, महागाई, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्थेचे धिंधवडे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला झालेली हानी आणि वाढती बेरोजगारी ही कारणे महायुतीच्या सत्तेविरोधात लाट आणत आहेत.
महाराष्ट्रातून गुजरातकडे जाणारे प्रकल्प हे देखील एक महत्वाचे सत्ताविरोधी कारण बनले आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी हाच मूळ पक्ष अशी लोकांची भावना आहे, याचा फटका अजित पवारांना बसणार आहे. परंतू शिवसेनेते त्याच्या उलट झाले आहे. उद्धव ठाकरे शिंदेंविरोधात जनादेश मिळवण्यात अपयशी ठरताना या सर्व्हेत दिसत आहेत.
कोकणात उद्धव ठाकरेंना फटका बसताना दिसत आहे. ठाणे आणि कोकण एकनाथ शिंदेंच्या, भाजपाच्या मागे ठामपणे उभे राहताना दिसत आहे. तर मुंबईत उद्धव ठाकरेंना मराठी मतदार, एससी, एसटी आणि मुस्लिम मतदारांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. काँग्रेसही मुंबईत चांगले पाय रोवताना दिसत आहे. मुंबईत प्रामुख्याने गरीब वि. श्रीमंत मतदार असा लढा पहायला मिळणार आहे.