Maharashtra Gram Panchayat Results: २ ग्रामपंचायतीत उमेदवारांना मिळाली समान मते; चिमुकलीला चिठ्ठी काढण्यासाठी बोलवले अन्... By मुकेश चव्हाण | Published: January 18, 2021 02:52 PM 2021-01-18T14:52:01+5:30 2021-01-18T15:21:06+5:30
राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये कडवी टक्कर दिसून येत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीही ग्रामीण भागातील आपला जनाधार कायम राखताना दिसत आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आता जी आकडेवारी समोर येते. काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे त्यामध्ये भाजपा चांगली कामगिरी करत असून, १४ हजारांपैकी सुमारे सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपाला यश मिळेल, संध्याकाळपर्यंत हा आकडा वाढेल, असा दावा भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्य यांनी केला आहे.
राज्यातील काही ग्रामपंचायतीचा निकाल हाती आले आहे. यामध्ये सध्या चर्चेत असणाऱ्या काही ग्रामपंचायतीच्या निकालाबाबत आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये हिवरेबाजारचा देखील समावेश आहे. ग्रामविकासामुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशाला दिशादर्शक असणारं 'आदर्श गाव हिवरेबाजार' येथे ३० वर्षांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली होती. या हिवरेबाजार ग्रामपंचायत निकालाचा सध्या हाती आलेल्या आकडेवारीनूसार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पॅनलचा सातही जागांवर विजय झाला आहे.
सिंधुदुर्गमधील कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींवर शिवसेनाप्रणित, तर एका ग्रामपंचायतवर भाजपानेप्रणित विजय मिळवला आहे. तालुक्यातील भिरवंडे आणि गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेने, तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायतीवर भाजपाने बाजी मारली आहे.
मात्र सिंधुदुर्गातील जवळपास ९० टक्के ग्रामपंचायतींवर आता भाजपाचीच निर्विवाद सत्ता आलेली असून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या अन्य ग्रामपंचायतीही हिसकावून घेण्यात राणे समर्थकांना यश आले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील काकोळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या युतीच्या पॅनल चा पराभव करीत मनसेच्या पॅनेलने वर्चस्व निर्माण केले आहे. या ग्रामपंचायतीवर एकूण सात सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.
त्यातील मनसेचे नरेश गायकर, सुरेखा गायकर, रेश्मा गायकर आणि जयश्री गायकर यांनी विजय मिळवत ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकवला आहे. तसेच रत्नागिरीच्या दापोलीत देखील मनसेने खातं उघडलं आहे. दापोलीतील नवशी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरीवले यांचा विजय झाला आहे.
ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना धक्के पोहचले आहे. यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत निकालात गावकऱ्यांनी काही ठिकाणी धक्कादायक कौल दिले आहेत, यातच पाटोदा ग्रामपंचायतीत लागलेला निकाल ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल, ज्या पाटोदा गावाचं नाव आदर्श ग्रामपंचायत आणि आदर्श सरपंच म्हणून देशभरात पोहचलं त्यांच्याच पॅनेलला गावकऱ्यांनी नाकारल्याचं चित्र आहे.
या निवडणुकीत आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनेलला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे यांनाही गावकऱ्यांनी नाकारलं आहे. अनुराधा पाटील यांना १८३ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला २०८ मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला.
काही ठिकाणी रंगतदार लढतही पाहायला मिळाली. यामध्ये सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील भाम्ब आणि बीजवडी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
माळशिरस तालुक्यातील भाम्ब येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आणि बीजवडीमध्ये भाजपाचा उमेदवार चिट्ठीवर विजयी झाले आहेत. दोन्ही ठिकाणी समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकण्याचा निर्णय घेतला.
यानंतर एका चिमुकलीला चिठ्ठी काढण्यासाठी बोलवण्यात आले. चिमुकलीने काढलेल्या चिठ्ठीत भाम्ब येथे राष्ट्रवादी आणि बीजवडीमध्ये भाजपाचा उमेदवार नशीबवान ठरले. सोलापूर तालुक्यात ७१ ग्रामपंचायतीसाठी ८४.८७ टक्के मतदान झाले आहे. ८९ हजार ७५६ पुरुष मतदार तर ७६ हजार ९५६ स्त्री मतदार असे एकूण १ लाख ६६ हजार ७१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार आहे. या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. या निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७९ टक्के मतदान झाले होते. आज मतमोजणीला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.