महायुतीविरुद्ध मविआ, विधिमंडळापासून संसदेपर्यंत कोणाकडे किती संख्याबळ? वाचा By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 03:45 PM 2023-07-04T15:45:41+5:30 2023-07-04T16:05:16+5:30
महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे २ उपमुख्यमंत्री आहेत. युतीत शिंदेंची शिवसेना, भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचा सहभाग आहे.
२०२४ च्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांशी बंड करून अजित पवारांना सोबत आणणे ही भाजपासाठी मोठी कामगिरी म्हणावी लागेल. एकीकडे भाजपाविरोधी पक्ष एकजूट होण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे विरोधी पक्षात फूट पाडून मोठी ताकद भाजपाने त्यांच्यासोबत आणली आहे.
महाराष्ट्रात २०१९ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना एकत्र लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र रिंगणात उतरले. भाजपा आणि शिवसेना युतीला बहुमत मिळाले होते. मात्र मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला होता. यानंतर शिवसेनेने भाजपसोबतचे तीन दशकाचे जुने नाते तोडले.
यानंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड करून भाजपाला पाठिंबा दिला. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांचे प्रयत्न हाणून पाडून राष्ट्रवादीला फुटण्यापासून वाचवले होते.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या विचारसरणीच्या ३ पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. २०१९ ते २०२२ पर्यंत ते मुख्यमंत्री होते. जून २०२२ मध्ये महाविकास आघाडीला पहिला आणि सर्वात मोठा धक्का बसला तो उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर. त्यांच्यासोबत ४० आमदारांनीही बंडखोरी केली. यानंतर उद्धव यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार पडले.
महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा उद्धव सरकारला १५३ आमदारांचा पाठिंबा होता शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५३ आणि काँग्रेस 44). मात्र शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर ही संख्या ११३ वर आली. यानंतर उद्धव सरकार पडले होते.
२८८ जागांसह भाजपा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपाचे १०६ आमदार आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेकडे ४०, राष्ट्रवादीचे ५३, काँग्रेसकडे ४४, उद्धव ठाकरे गटाकडे १६ आणि २९ अपक्ष आणि इतर पक्षाचे आमदार आहेत. परंतु आता राष्ट्रवादीतही फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्याकडे किती आमदार आहेत ती संख्या अजून उघड झाली नाही.
राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदार असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. म्हणजेच दोन तृतीयांशपेक्षा जास्त. मात्र, अजितदादांच्या गटात सध्या एकूण २४ आमदार आहेत, तर १४ आमदार शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षातील इतर १५ आमदार आहेत, जे अद्याप कोणत्याही गटात नाहीत. ते तटस्थ आहेत.
सध्या स्थितीत आकड्यांबाबत बोलायचे झाले तर महायुतीकडे भाजप (१०६), शिंदे गटातील शिवसेना (४०), अजित पवार (२४), बहुजन विकास आघाडी ३, प्रहार जनशक्ती पक्ष २, अपक्ष १३ आणि राष्ट्रीय समाज पक्ष - जनसुराज शक्ती पक्षाकडे १-१ आमदार आहेत. म्हणजेच २८८ जागा असलेल्या सभागृहात एनडीए सरकारला १९० आमदारांचा पाठिंबा आहे.
लोकसभेत महाराष्ट्रातील ४८ खासदारांपैकी सर्वाधिक २२ खासदार भाजपचे आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडे १२, शिवसेना उद्धव गटाकडे ६, राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४ आणि काँग्रेसकडे १, एआयएमआयएमकडे १ आणि १ अपक्ष खासदार आहेत. राज्यसभेत १९ पैकी ९ जागा महाविकास आघाडीकडे आहेत.