Maharashtra Politics: महाराष्ट्रातील १५ दिवसांचा घटनाक्रम, ज्यामुळं महाविकास आघाडीची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 08:14 PM2022-03-30T20:14:43+5:302022-03-30T20:20:00+5:30

देशात अलीकडेच ५ राज्याच्या निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर अनेक राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात मागील २ महिन्यापासून १० मार्चनंतर राजकीय वादळ येणार असं सांगितले जात होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर महाविकास आघाडीचे नेते खिल्ली उडवत होते. मात्र महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे का? असा प्रश्न समोर येत आहे.

१० मार्च रोजी झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला. निकालानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दावा केला की २०२४ मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस महाराष्ट्रात महाविकास आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युतीत फुटीचे पुढील संकेत १८ मार्च २०२२ रोजी मिळाले. या दिवशी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे २५ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला.

महाविकास आघाडीतील नाराजी केवळ काँग्रेसमध्येच आहे असं नाही. मुख्यमंत्रीपद असूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही मविआत दुय्यम दर्जा मिळत असल्याची तक्रारी आहेत. ही तक्रार पक्षनेतृत्वाकडून आलेली नाही, तर खासदारापासून आमदारापर्यंत याप्रश्नी निवेदन देण्यात आले आहे. ज्यात अर्थसंकल्पावर बहिष्कार आणि निधी वाटपावरून दुजाभाव होत असल्याची नाराजी आहे.

महाविकास आघाडी आघाडीत आतापर्यंत ज्या पक्षाने नाराजी व्यक्त केली नाही तो म्हणजे राष्ट्रवादी. पक्षाने आतापर्यंत शिवसेना किंवा काँग्रेसवर थेट कोणतेही वक्तव्य केलेले नाही, परंतु रिपोर्टनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या योजनेविरोधात आवाज उठवला आहे, ज्यात मुख्यमंत्र्यांनी ३०० आमदारांना घरं देण्याची घोषणा केली.

काँग्रेसचे आमदार आघाडीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. या आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही पत्र लिहून या गोष्टी लवकरात लवकर दखल देण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने तर असे म्हटले आहे की, मंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात कामे राबविण्याच्या आमदारांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले, तर निवडणुकीत पक्षाची चांगली कामगिरी कशी होईल? असा सवाल केला जात आहे. मात्र ही बातमी प्रदेशाध्यक्षांनी फेटाळून लावली आहे.

दुसरीकडे, आघाडीतील सुरू असलेला वाद आता एक पाऊल पुढे नेण्याचे काम काँग्रेसने केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे दिलीप लांडे यांच्या विरोधात पराभूत झालेले पक्षाचे नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब आणि सरकारमधील अनेक नेत्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

प्रचाराची मुदत संपली असतानाही या नेत्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पदयात्रा काढल्या आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप खान यांनी केला आहे. काँग्रेसच्या नेत्याने आपल्याच मित्रपक्षाला अशाप्रकारे घेरल्याने महाराष्ट्र सरकारसाठी येणारे दिवस अत्यंत कठीण असल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ सदस्य आहे. त्यापैकी 170 आमदार महाविकास आघाडीकडे आहेत, तर एनडीएच्या आमदारांची संख्या ११३ आहे. शिवसेना (५७), राष्ट्रवादी (५३) आणि काँग्रेस (४३) या तीन पक्षांच्या जोरावर MVA सत्तेत राहण्यात यशस्वी ठरली आहे.

या तीन पक्षांच्या एकूण जागांची संख्या MVA ला बहुमताच्या आकड्याच्या पुढे घेऊन जाते. १५३ जागांवर ३ पक्षांचे आमदार आहेत तर उर्वरित मित्र पक्ष आणि अपक्षांच्या आहेत. महाविकास आघाडीत सामील असलेल्या तीन मोठ्या पक्षांव्यतिरिक्त, इतर चार पक्षांच्या भूमिकेबद्दल स्पष्टपणे काहीही सांगणे घाईचे आहे. तसेच शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या आठ अपक्षांपैकी ४ जणांचे थेट भाजपशी संबंध आहेत.

दुसरीकडे, भाजपाकडे सध्या ११३ आमदार आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ३२ आमदारांचा पाठिंबा लागेल. भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा दावा खरा मानला तर एनडीएकडे असलेल्या आमदारांची संख्या १३८ वर पोहोचली आहे. म्हणजेच अजूनही भाजपा आघाडी बहुमतापासून काही पाऊल दूर आहे.