मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार... By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 08:39 PM 2024-11-06T20:39:11+5:30 2024-11-06T21:06:20+5:30
Mahavikas Aghadi - Mahayuti Manifesto: जाहीरनाम्यावरून महायुती आणि मविआत स्पर्धा लागली आहे. कोण कोणापेक्षा जास्त देतो हेच यातून दिसत आहे. मविआ आणि महायुतीचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा जवळपास जाहीर झाला आहे. मंगळवारी उद्धव ठाकरेंनी ५ गॅरंटी सांगितल्यानंतर महायुतीने त्यांच्या १० गॅरंटी देऊन टाकल्या आहेत. आज काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा जाहीर केला आहे. निवडणुकीचा काळ असल्याने सत्ताधारी महायुतीने आधीच त्याची पेरणी करायला सुरुवात केली होती. आता विरोधकांनीही त्यावर कडी केली आहे.
महायुती लाडक्या बहिणीला दर महिन्याला २१०० रुपये देणार आहे. १५०० रुपयांवरून ही रक्कम वाढविण्यात आली आहे. तर महाविकास आघाडी लाडक्या बहिणीला दर महिन्याला ३००० रुपये देणार आहे. म्हणजेच महायुतीपेक्षा ९०० रुपये जास्तीचे देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच महायुती महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात नोकरी देणार आहे.
महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेद्वारे वर्षाला १५ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. एमएसपीवर २० टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. तर मविआने शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याचे जाहीर केले आहे.
ठाकरे गटाने पाच वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन दिलेले आहे. तर महायुतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन दिले आहे. महायुतीने प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन दिले आहे. तर ठाकरेंनी धारावी आणि मुंबई परिसरात महाराष्ट्रातील भूमिपूत्रांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन देण्याचे वचन दिले आहे. काँग्रेसने यावर काहीही वचन दिलेले नाही.
रोजगार, शिक्षण... उद्धव ठाकरेंनी मुली व मुलांना मोफत शिक्षण देण्याचे वचन दिले आहे. तर काँग्रेसने बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. महायुतीने 25 लाख रोजगारनिर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना ₹10,000 विद्यावेतन देण्याचे आश्वासन दिले आहे.
महायुतीचे एक्स्ट्राचे काय... महायुतीने वृद्धांना महिन्याला ₹1500 वरून ₹2100 देण्याचे वचन दिले आहे. 45,000 गावांत पांदण रस्ते बांधणार असे जाहीर केले आहे. तसेच अंगणवाडी आणि आशा सेविकांना ₹15,000 आणि विमा संरक्षण देण्याचे सुरक्षा कवच देण्याचे महायुतीने आश्वासन दिले आहे. वीज बिलात 30% कपात करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मविआने यावर अद्याप काही जाहीर केलेले नाही.
महायुतीने महिलांना ५० टक्के सवलतीच्या दरात बस प्रवास दिला आहे. तर मविआ महिला व मुलींना मोफत बस प्रवास देणार आहे.