शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 02:36 PM2024-11-28T14:36:25+5:302024-11-28T15:13:30+5:30

Mahayuti vs Mahavikas aghadi Vote Percentage: महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती मतदान? लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीची किती मते वाढली, आकडेवारी पहाल तर...

महाराष्ट्रात प्रचंड बहुमताने महायुतीची सत्ता आली आहे. मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात विविध कारणांवरून रोष होता, असा दावा विरोधक करत आहेत. परंतू, महायुतीला पडलेले मतदान पाहता लोकसभेपेक्षा जास्तीचे मतदान भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला झाले आहे. तर ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार गटाचे मतदान घटले आहे.

२०१९ ला लोकसभेला महाराष्ट्रात एकूण ८.८६ कोटी मतदार होते. त्यात २०२४ ला हे मतदार ३७ वाढून ९.२३ कोटी झाले होते. तर अवघ्या तीन महिन्यांत यात ४७ लाख मतदारांची वाढ झाली होती. विधानसभेला एकूण ९.७ कोटी मतदार होते.

आता विधानसभेच्या मतदानात आणि लोकसभेच्या मतदानात मोठा फरक आहे. हाच फरक महायुतीला विजयाकडे घेऊन गेला. महायुती आणि मविआच्या मतदानाच्या आकडेवारीत मोठा फरक आहे.

अजित पवारांची राष्ट्रवादी ५८.१ लाख मते घेऊन ४१ जागा जिंकली आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी ७२.८ लाख मते मिळवत १० जागाच जिंकू शकली आहे. या दोन्ही गटात ३९ जागांवर थेट लढत झाली. यापैकी अजित पवारांच्या पक्षाने ३३ जागा जिंकल्या आहेत. लोकसभेला अजित पवार गटाला २०.५ लाख मते तर शरद पवार गटाला ५८.५ लाख मते मिळाली होती.

भाजपाला लोकसभेला १ कोटी ४९ लाख एवढे मतदान झाले होते. तर विधानसभेला १ कोटी ७२ लाख एवढे मतदान झाले आहे. जवळपास २३ लाखांनी मतदान वाढले आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला लोकसभेला ७३.७ लाख मतदान झाले होते, तर विधानसभेला ७९.९ लाख मतदान झाले आहे. हे जवळपास ६ लाखांनी वाढ झाली आहे.

महायुतीला लोकसभेला एकूण २ कोटी ४३ लाख मते मिळाली होती. तर विधानसभेला या मतांत प्रचंड वाढ होऊन ती ३ कोटी १० लाखांवर गेली आहेत.

मविआची लोकसभेच्या मतांत आणि विधानसभेच्या मतांच्या आकड्यात जवळपास २३ लाखांचा फरक आहे. मविआला लोकसभेला २.५० कोटी मते मिळाली होती. तर विधानसभेला ती घटून २ कोटी १७ लाख मते मिळाली आहेत.

यात काँग्रेसला लोकसभेला ९६.४ लाख मते मिळाली होती तर विधानसभेला ८०.२ लाख मते मिळाली आहेत. म्हणजेच काँग्रेसची १६ लाखांनी मते कमी झाली आहेत.

तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभेत ९५.२ लाख मते मिळाली होती. तर विधानसभेला ६४.३ लाख मते मिळाली आहेत. म्हणजेच जवळपास ३१ लाख मतांचा फटका उद्धवसेनेला बसला आहे.

शरद पवारांची मते वाढली तरी ते अजित पवारांपेक्षा जास्त मतदारसंघात लढत होते. यामुळे ही मतांची टक्केवारी वाढल्याचे दिसत आहे. तर उद्धव ठाकरेंना कोकण पट्ट्यात मोठा फटका बसल्याने त्यांची टक्केवारी कमी झाली आहे. एकंदरीतच महायुती आणि मविआच्या मतांमधील विधानसभेचा फरक हा ८७ लाख एवढा प्रचंड आहे. तर लोकसभेला हाच फरक ६.८ लाख एवढाच होता.