उद्धव ठाकरेंच्या हातून सरकार गेलं, आता आघाडीतही बिघाडी? काँग्रेस नेते म्हणाले, “आम्हाला फायदा नाही..”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 01:50 PM2022-08-22T13:50:02+5:302022-08-22T13:56:02+5:30

शिवसेनेने महाविकास आघाडीचा एका सेतूप्रमाणे वापर केला, एक विशेष वर्ग त्यांच्याकडे विश्वासू सोबती म्हणून पाहत नाही, काँग्रेस नेत्याचं वक्तव्य.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. तब्बल ४० पेक्षा जास्त आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचीही घोषणा केली होती.

त्यानंतर राज्यातील राजकारण तापलं होतं. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी भाजपच्या मदतीनं राज्यात सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतली. महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तारही पार पडलला. असं असलं तरी दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काही बिघाडी होते की काय अशी शक्यता दिसत आहे.

महाराष्ट्रात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापन करण्यात आली होती. परंतु याचा काँग्रेसला कोणताही फायदा झाला नाही, असं काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचं म्हणणं आहे. दरम्यान, त्यांचं हे वक्तव्य शिवसेनेसाठी एक संकेत असल्याचंही म्हटलं जातंय. इकॉनॉमिक टाईम्सशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. याद्वारे काँग्रेसनं त्यांना महाविकास आघाडीचा फायदा झाला नसल्याचं स्पष्ट केलंय. तसंच काँग्रेसमध्ये अनेक लोक शिवसेनेकडे विश्वासू सोबती म्हणून पाहत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

गुजरातमध्येदेखील काँग्रेसचा मार्ग सोपा नसेल आणि त्यांना विजयासाठी एकत्र यायला हवं. शिवसेना आणि आमच्या विचारधारेत खुप मोठं अंतर आहे त्यामुळेच एक विशेष वर्ग त्यांच्याकडे विश्वासू सोबती म्हणून पाहत नाही. भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी ही आघाडी करण्यात आली होती. या आघाडीचा काँग्रेसला कोणताच अधिक फायदा झाला नाही असं माझ्यासारख्या अनेक लोकांना वाटत असल्याचंही देवरा म्हणाले. या आघाडीचा सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

एकीकडे काँग्रेस आपला बेस वाढवण्यास अपयशी ठरली आहे. तर दुसरीकडे शिवसेना सातत्यानं काँग्रेसच्या कोअर वोटर्सपर्यंत पोहोचत आहे. त्यांनी या महाआघाडीचा एका सेतूप्रमाणे वापर केला आणि लोकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहे. हे आघाडीच्या विरोधात आहे आणि आम्हाला अनेक नेत्यांकडून याच्या तक्रारीही मिळाल्या असल्याचं देवरा म्हणाले.