उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपायला आली, पण मविआ, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटेना, अजून एवढ्या जागांवर वाद कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:09 AM2024-10-28T11:09:54+5:302024-10-28T11:16:48+5:30

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास आता अवघे काही तास उरले आहेत. मात्र तरीही राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये अजूनही काही जागांवर एकमत होऊ शकलेलं नाही.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास आता अवघे काही तास उरले आहेत. मात्र तरीही राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये अजूनही काही जागांवर एकमत होऊ शकलेलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने २९ तर महायुतीने तब्बल ५३ जागांवर अद्याप उमेदवार घोषित केलेले नाहीत. यादरम्यान, महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीनेही वेगळं लढण्याचे संकेत दिले आहेत.

सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांमधील महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अनेक जागांवर एकमत होत नाही आहे. त्यामुळे अनेक जागांवरील उमेदवारांची घोषणा लांबणीवर टाकण्यात आली आहे. दरम्यान, आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा होऊन चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने आतापर्यंत २३५ उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात भाजपाने १२१, शिंदे गटाने ६५ आणि अजित पवार गटाने ४९ उमेदवारांची घोषणा केली आहे. महायुतीकडून अद्याप ५३ जागांवर उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. यापैकी अनेक जागांवर तिन्ही पक्षांमध्ये अद्याप एकमत होऊ शकलेलं नाही.

मिळत असलेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये भाजपा १५३ ते १५६, शिंदे गट ७८ ते ८० आणि अजित पवार गट ५३ ते ५५ जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत एकूण २५९ उमेदवारांची घोषणा झाली आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाने ८४, काँग्रेसने ९९ तर शरद पवार गटाने ७६ उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीमध्ये अजूनही २९ जागांवर मतभेद असल्याची चर्चा आहे. त्यापैकी काही जागांवर दोनहून अधिक दावेदार आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय घेणं कठीण झालं आहे. काही जागांवर तर महाविकास आघाडीमधील दोन पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस १०३ ते १०८, जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला ९० ते ९५ आणि शरद पवार गटाला ८० ते ८५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

याआधी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी तिन्ही पक्षांमध्ये ८५-८५-८५ जागांचं समान वाटप झाल्याचे सांगितले होते. तर बाळासाहेब थोरात यांनी तिन्ही पक्ष प्रत्येक ९० जागांवर उमेदवार देतील, अशी माहिती दिली होती.

दरम्यान, महायुतीमध्ये अजूनही वाद असलेल्या जागांमध्ये वर्सोवा, मीरा भाईंदर, मानखुर्द, वसई, आष्टी, कराड उत्तर, मोर्शी, शिवडी, कलिना, अणुशक्तिनगर, धारावी, ठाणे, करमळा, बार्शी, अमरावती, बाळापूर, बीड, कन्नड, सिंदखेड राजा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

तर महाविकास आघाडीमध्ये, सिंदखेडा, शिरपूर, अकोला पश्चिम, दर्यापूर, मोर्शी, पुसद, पैठण, बोरिवली, मुलुंड, मलबार हिल, कुलाबा, खेड-आळंदी, दौंड, मावळ, कोथरुड, औसा, उमरगा, माढा, वाई, माण, सातारा, मिरज, खानापूर या जागांवर तिढा कायम आहे. याशिवाय भिवंडी पूर्व, मानखुर्द शिवाजीनगर, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, कळवण, डहाणू आदी जागा मित्रपक्षांना सोडण्यावरही अंतिम निर्णय झालेला नाही.