Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून कोणत्या महिलांना बाहेर काढणार?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:57 IST2025-01-20T13:49:41+5:302025-01-20T13:57:27+5:30
Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता लाडकी बहीण योजनेतून किती लाभार्थी कमी केले जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या नियम आणि अटींबाबत वारंवार चर्चा होत असते.
या योजनेतून अनेक सधन कुटुंबातील महिलांनीही आर्थिक लाभ घेतल्याचं उघड झाल्याने योजनेचे निकष आणखी कठोर करण्याबाबत सरकार दरबारी विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
सरकार आधी दिलेली रक्कम कोणाकडूनही वसूल करणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं असलं तरी नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांचा पत्ता मात्र कट होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेच्या नियमांबाबत आणि लाभार्थ्यांबाबत शिर्डी इथं आयोजित राष्ट्रवादीच्या शिबिरात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
लाडकी बहीण योजना सुरू राहील, मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांबाबत वेगळा विचार केला जाईल, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
लाडकी बहीण योजना ही गोरगरीब घटकातील महिलांना डोळ्यांसमोर ठेवून सुरू केली. मात्र करदाते, नोकरदार तसेच ऊस उत्पादक महिलांबाबत वेगळा विचार करत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता लाडकी बहीण योजनेतून किती लाभार्थी कमी केले जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच दिली आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.