Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण? By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 03:49 PM 2024-11-01T15:49:51+5:30 2024-11-01T15:59:10+5:30
who is rashmi shukla ips: भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असलेल्या आयपीएस रश्मी शुक्ला यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने चर्चेत आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे त्या चर्चेत असून, त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात... महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांच्यावर आरोप करत काँग्रेसने त्यांना डीजीपी पदावरून हटवण्याची मागणी केलीये. फोन टॅपिंग आणि भाजपला मदत केल्याचे आरोप त्यांच्यावर केले गेले आहेत.
आयपीएस रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत. १९८८ च्या बॅचच्या त्या आयपीएस अधिकारी आहेत. ४ जानेवारी २०२४ रोजी त्यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होण्यापूर्वी, त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक होत्या. जून २०२४ मध्ये त्या निवृत्त होणार होत्या. पण, सरकारने त्यांना मुदतवाढ दिली. त्यामुळे त्या अजूनही पोलीस महासंचालक आहे.
आयपीएस रश्मी शुक्ला या मुंबईकर आहेत. १५ ऑगस्ट १९६५ मध्ये त्यांचा मुंबईत जन्म झाला.
आयपीएस रश्मी शुक्ला यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट झेवियर्स स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
वयाच्या २२ व्या वर्षी म्हणजेच १९८८ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आणि आयपीएस अधिकारी बनल्या.
आयपीएस रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्र केडर मिळाले. आयपीएस शुक्ला यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस अधिकारी म्हणून काम केले आहे. तत्कालिन औरंगाबाद ग्रामीण, नाशिक ग्रामीण, सातारा आणि पुणे ग्रामीणच्या त्या पोलीस अधीक्षक होत्या.
त्याचबरोबर मुंबईत अतिरिक्त पोलीस आयुक्त, नागपूर आणि पुणे येथे गुन्हे शाखा मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर त्या होत्या. केंद्रीत प्रतिनियुक्ती झाल्यानंतर त्या दिल्लीत सीबीआयमध्ये डीआयजी, तर हैदराबाद येथे सीआरपीएफच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक होत्या.
आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप झाले. त्यांच्यावर नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला. मुंबई आणि पुणे येथे याप्रकरणात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. या प्रकरणात त्यांना मुंबई उच्च न्यायालयात क्लीन चीट मिळाली होती.