'नफरत छोडो, भारत जोडो', राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी टाकळी-नांदेड मार्गावर लोटला जनसागर By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 06:16 PM 2022-11-08T18:16:51+5:30 2022-11-08T18:23:01+5:30
Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला पाठींबा देण्यासाठी जनसागर रस्त्यावर उतरला होता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला पाठींबा देण्यासाठी जनसागर रस्त्यावर उतरला होता. टाकळी नांदेड मार्गावर कित्येक किलोमीटरवर पदयात्रेतील वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
मंगळवार दिनांक ८ रोजी सकाळी ८.३० वाजता वन्नाळी गुरुद्वारा येथून पदयात्रेला सुरूवात झाली. छोटी मुले, महिला आणि युवा वर्ग मोठया उत्साहात यात्रेत सहभागी झाला होता
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मोठ्या संख्येने युवा वर्ग या यात्रेत सामील झाला होता. ३० ते ४५ वयोगटातील तरुणांची संख्या जास्त होती. दुपारच्या कडक ऊन्हात रस्त्यावर आणि रस्त्याच्या आजूबाजूला गर्दी पदयात्रेत सामील होण्याची वाट पाहत होती
राहुल गांधींच्या बरोबर चालण्यासाठी अनेकजण धावाधाव करत होते. टप्याटप्यावर "नफरत छोडो भारत जोडो" घोषणा देत पुरुष आणि महिलांचे छोटे मोठे समूह या गर्दीत सामील होत होते आणि गर्दीचे रूपांतर जनसगरात झाले होते
खतगाव हायस्कुलचे विद्यार्थी शालेय गणवेशात यात्रेकरूंच्या स्वागतासाठी उभे होते. टाळ्यांच्या कडकडाट करत "वेलकम सर... वेलकम सर" म्हणत अभिवादन करत होते.
सुमारे ४५ मिनिटे चालून पदयात्रा भोपळ्याच्या टेकडीला आली तेव्हा यात्रेच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वारांनी लक्ष वेधून घेतले.
एके ठिकणी सनई डफली आणि ताशाच्या पारंपरिक वाद्यांनी एक वृद्ध वाजंत्री गट सर्वांचे स्वागत करत होता