मोदींना नमवण्यासाठी विरोधी पक्षांचा जबरदस्त प्लॅन, INDIA ची स्थापना करून दिले ५ राजकीय संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 10:15 AM2023-07-19T10:15:23+5:302023-07-19T10:20:29+5:30

INDIA Alliance: २६ विरोधी पक्षांनी बंगळुरू येथील बैठकीत एकत्र येत नरेंद्र मोदी आणि भाजपाला मात देण्यासाठी INDIA नावाच्या नव्या आघाडीची स्थापना केली आहे.आता नव्याने स्थापन झालेली इंडिया आघाडी १९७७ आणि १९८९ प्रमाणे कमाल करून दाखवेल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली २६ विरोधी पक्षांनी बंगळुरू येथील बैठकीत एकत्र येत नरेंद्र मोदी आणि भाजपाला मात देण्यासाठी INDIA नावाच्या नव्या आघाडीची स्थापना केली आहे. त्याबरोबरच २००४ मध्ये स्थापन झालेल्या यूपीएचं अस्तित्व संपुष्टात आलं आहे. आता नव्याने स्थापन झालेली इंडिया आघाडी १९७७ आणि १९८९ प्रमाणे कमाल करून दाखवेल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मंगळवारी झालेल्या २६ जणांच्या आघाडीचं इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इंक्लुसिव्ह अलायन्स याचं संक्षिप्त नाव इंडिया असं आहे. या आघाडीच्या स्थापनेतून काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला मोठा संदेश दिला आहे. तसेच त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या आघाडीने दिलेले ५ राजकीय संदेश पुढीलप्रमाणे आहेत.

मंगळवारी स्थापन झालेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीमुळे विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नचिन्हांना पूर्णविराम लागला आहे. विरोधी ऐक्य कसं शक्य आहे, असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात येत होता. मात्र बंगुळुरूमधील बैठकीत केवळ आघाडीचं नाव तर निश्चित झालं. त्याबरोबरच २०२४ मध्ये मोदींविरोधात इतर सर्व अशा लढाईसाठी सर्व विरोधी पक्ष गंभीर असल्याचे आणि त्यासाठी हवा तो त्याग करण्यास तयार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

२०२४ मध्ये मोदींना आव्हान देणाऱ्या आघाडीमध्ये किती विरोधी पक्ष सहभागी होतील, असा सवाल उपस्थित होत होता. मात्र आता २६ पक्ष एकत्र आले असून, त्यामध्ये अनेक प्रबळ प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे ही आघाडी दोन वेळा स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपा आणि एनडीएला आव्हान देऊ शकते, असा संदेश देशभरातील राजकीय वर्तुळामध्ये आणि जनतेमध्ये पोहोचला आहे.

इंडिया असं नाव घेऊन एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये सहभागी झालेल्या अनेक पक्षांची विचारसरणी ही वेगवेगळी आहे. तसेच अनेक पक्ष हे राज्य पातळीवर एकमेकांचे विरोधक आहेत. बंगालमध्ये तृणमूल आणि काँग्रेस हे एकमेकांचे विरोधक आहेत. तर अनेक राज्यांमध्ये आप आणि काँग्रेस हे प्रतिस्पर्धी आहेत. नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे हे गेल्या निवडणुकीत एनडीएमध्ये होते. मात्र यावेळी ते विरोधकांच्या आघाडीमध्ये आहेत.

जर या आघाडीचं नाव पाहिलं तर त्या नावामध्येच विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या शक्तीचा मंत्र असल्याचे दिसून येत आहे. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इंक्लुसिव्ह अलायन्स, असं हे नाव आहे. त्यात डेव्हलपमेंट म्हणजे विकासाचं राजकारण असा आहे. तर इंक्लुसिव्ह म्हणजे सर्वांचा सन्मान, म्हणजेच द्वेषाविरोधात प्रेमाचं राजकारण.

भारताच्या राजकारणामध्ये केंद्रीय सत्तेविरोधात सर्व विरोधी पक्षांचं ऐक्य होण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी १९७७ मध्ये पहिल्यांदा विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. त्यावेळी केंद्रात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा विरोधी आघाडीचं सरकार बनलं होतं. त्यानंतर १९८९ मध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं होतं. आता २०२४ मध्ये पुन्हा एकदा विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे काय निकाल लागेल, याबाबत औत्सुक्य निर्माण झालं आहे.