अमरिंदर सिंग यांचा या राजघराण्याशी आहे संबंध, अपमान झाला म्हणून पूर्वजांनी रोल्स रॉयसमधून उचलवला होता कचरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 05:44 PM2021-09-30T17:44:59+5:302021-09-30T17:55:15+5:30

Amarinder Singh: पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून झालेली उचलबांगडी आणि नंतर काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध उघडलेली आघाडी यामुळे सध्या कॅप्टन अमरिंदर सिंग हे चर्चेत आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग देशातील एका प्रसिद्ध राजघराण्याशी संबंधित असून, या राजघराण्याचे अनेक किस्से इतिहासामध्ये चर्चिले जातात.

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून झालेली उचलबांगडी आणि नंतर काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध उघडलेली आघाडी यामुळे सध्या कॅप्टन अमरिंदर सिंग हे चर्चेत आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग देशातील एका प्रसिद्ध राजघराण्याशी संबंधित असून, या राजघराण्याचे अनेक किस्से इतिहासामध्ये चर्चिले जातात.

या राजघराण्याचं नाव आहे पतियाला राजघराणं. या राजघराण्याचे वैभव, शौर्य, राजांच्या राण्या यांच्या अनेक कहाण्या सांगितल्या जातात. या राजघराण्याची सुरुवात १६६५ मध्ये बाब अली सिंग यांच्यापासून झाली होती. तर तर अखेरचे राजे यादवेंद्र सिंग होते. ते १९३८ मध्ये गादीवर बसले होते. नंतर हे संस्थान भारतात विलीन झाले.

पतियाळा राजघराण्यातील महाराजा भूपिंदर सिंग हे देशातील असे पहिले व्यक्ती होते ज्यांच्याकडे स्वत:चं प्रायव्हेट प्लेन होतं. त्यासाठी राजांनी पतियाळा येथे एक धावपट्टीही तयार केली होती. या विमानामधून त्यांनी खूप प्रवास केला. १९१० मध्ये त्यांनी हे विमान खरेदी केले होते. तत्पूर्वी भारतातील कुठल्याही राजघराण्याकडे विमान नव्हते.

या संस्थानचे राजे आलिशान जीवन जगायचे. जेव्हा ते परदेशात जायचे तेव्हा संपूर्ण हॉटेलच भाड्याने घ्यायचे. परदेशात जाताना त्यांच्यासोबत त्यांचा मोठा लावाजमाही जायचा. त्यांचा स्टाफ ग्राऊंड फ्लोअरवर तर राजे पहिल्या फ्लोअरवर राहायचे.

महाराज भूपिंदर सिंग यांच्याकडे तेव्हाची आलिशान गाडी असलेल्या रोल्स रॉयसचा मोठा ताफा होता. एकदा महाराजांनी या कंपनीला नव्या गाड्यांसाठी ऑर्डर दिली असता कंपनीने टाळाटाळ केली. तेव्हा नाराज झालेल्या महाराजांनी आपल्याकडील रोल्स रॉयस कार शहरातील कचरा उलण्याच्या कामात लावल्या. त्यामुळे कंपनीला मोठा धक्का बसला. त्यांनी महाराजांची माफी मागत त्यांना नव्या गाड्या उपलब्ध करून दिल्या.

पतियाळाच्या महाराजांकडे अनेक आलिशान कार होत्या. दरम्यान, १९३५ मध्ये महाराज जर्मनीला गेले असताना त्यांची भेट हुकुमशाहा हिटलरसोबत झाली होती. त्यावेळी हिटलरने त्याच्याकडील मेबॅक कार महाराजांना भेट म्हणून दिली होती.

पतियाळाच्या महाराजांनी भारतीय क्रिकेटच्या वाटचालीत मोठं योगदान दिलं होतं. ते भारतीय क्रिकेटचे कर्णधारही बनले होते. तसेच बीसीसीआयची स्थापना होत असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली. एवढंच नाही तर १९३० च्या दशकात एकदा त्यांनी १० हजार पौंड मोजून ऑस्ट्रेलियाच्या संघाला पतियाळामध्ये आणले होते.

महाराजा भूपिंदर सिंग यांनी १० लग्ने केली होती. तसेच त्यांच्या हरममध्ये ३०० हून अधिक उपराण्या होत्या. त्यातील काही जणी खूप सुंदर होत्या. महाराजांना एकूण ८८ मुले होती. त्यामुळे ते जेव्हा परदेशात जात तेव्हा त्यांच्यासोबत मोठा लावाजमा असायचा. तसेच त्यांनी काही परदेशी महिलांशीही लग्न केलं होतं.

महाराजा यादवेंद्र सिंह पतियाळा राजघराण्याचे शेवटचे महाराज होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे त्यांचेच चिरंजीव आहेत. यादवेंद्र सिंग भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे दीर्घकाळपर्यंत अध्यक्ष राहिले. देशात १९५२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या तेव्हा त्यांनी मोठे योगदान दिले होते.