Babiya Crocodile Died: जगातील एकमेव 'शाकाहारी' मगरीचा मृत्यू; केरळमधील मंदिरात 75 वर्षांपासून होते वास्तव्य... By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 03:31 PM 2022-10-10T15:31:28+5:30 2022-10-10T15:37:56+5:30
Babiya Crocodile Died: केरळच्या प्रसिद्ध अनंतपुरा मंदिरात राहणाऱ्या 'बाबिया' मगरीचे निधन झाले. ही मगर मांसाहाराऐवजी मंदिराच्या प्रसादावर जगायची. वाचा या मगरीची अनोखी कहानी... Babiya Crocodile Died: जगातील एकमेव शाकाहारी मगरीचे निधन झाले आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलं, शाकाहारी मगर. लाखो वर्षांपासून पृथ्वीवर राहणारी मगर मांसाहारी प्राणी आहे, पण भारतात एक अशी मगर होती, जी पूर्णपणे शाकाहारी होती. दक्षिण भारतातील एका मंदिरात ही शाकाहीर मगर राहायची. बाबिया(Babiya Crocodile) असे या मगरीचे नाव होते. 9 ऑक्टोबर रोजी बाबियाचा मृत्यू झाला.
कधीही कोणावर हल्ला केला नाही- 'पाण्यात राहून मगरीशी वैर करायचे नाही' ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. याचे कारण म्हणजे, मगर आपल्या जबड्यात आलेल्या शिकारीला कधीही जिवंत जाऊ देत नाही. एखाद्या प्राणी मगरीच्या तावडीत सापडला आणि तो जिवंत परतला, असे क्विचतच पाहायला मिळते. पण, बाबीया पूर्णपणे शाकाहारी आणि माणसाळलेली होती. ती कधीही कोणत्या व्यक्तीवर किंवा प्राण्यावर हल्ला करत नसे. ती मांसाहाराऐवजी मंदिरातील प्रसाद खायची.
कोणत्या मंदिरात होती बाबिया?- उत्तर केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील अनंतपुरा (Ananthpura Temple) नावाच्या एका छोट्याशा गावात श्री अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराच्या तलावात बाबिया मगर राहायची. सुमारे 75 वर्षांपासून बाबियाचे तलावात वास्तव्य होते. मंदिराचे पुजारी बाबिला दिवसातून दोनदा खाऊ घालायचे. मंदिराचा प्रसाद खाऊन बाबिया जगायची. पुजार्याची आणि तिची एक अनोखी केमिस्ट्री होती. मंदिराच्या तलावात पुरेसे मासे होते, पण बाबियाने कधीही मासे खाल्ले नसल्याचा दावा मंदिरातील कर्मचाऱ्याने केला आहे.
भाविक हाताने अन्न द्यायचे-मंदिरातील पुजारी बाबियाला दिवसातून दोनवेळा प्रसाद खाऊ घालायचे. याशिाय, मंदिरात येणारे भाविकही तिला तांदुळ आणि गुळ खायला द्यायचे. बाबिया हे शाकाहारी अन्न मोठ्या आनंदाने खायची. विशेष म्हणजे, बाबियाने इतक्या वर्षात एकाही भाविकावर हल्ला केला नाही. भूक लागायची तेव्हा बाबिया तलावातून बाहेर यायची. एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे ती मंदिरात फिरायची. कोणीही तिला घाबरत नसे.
मंदिराचा आहे पुरातन इतिहास- अनंतपुरा मंदिर केरळमधील एकमेव मंदिर आहे, जे तलावात बनले आहे. या मंदिराला पद्मनाभस्वामी मंदिर (तिरुवनंतपुरम) चे मूळस्थान मानले जाते. याच मंदिरात 'अनंतपद्मनाभा'ची स्थापना झाल्याची मान्यता आहे. एका आख्यायिकेनुसार, एकदा श्री विलासमंगलाथु स्वामी (भगवान विष्णूचे भक्त) तपश्चर्या करत होते. या दरम्यान भगवान श्रीकृष्ण लहान मुलाच्या रूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांना त्रास देऊ लागले.
मुलाच्या वागण्याने व्यथित होऊन त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर ते जवळच्या गुहेत बेपत्ता झाले. नंतर त्यांना कळले की, ते मूल दुसरे कोणी नसून भगवान श्रीकृष्णच होते. तेव्हापासून असे मानले जाते की श्रीकृष्ण ज्या गुहेत गायब झाले होते, ती आजही तिथेच आहे. यासोबतच श्रीकृष्णाचाही वास आहे. तेव्हापासून मगर गुहेच्या आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करते.
मगर पाहणे लोक भाग्यवान मानतात- जर एखाद्या भक्ताला बाबिया मगर दिसली तर तो भाग्यवान समजला जातो. पुरोहितांच्या म्हणण्यानुसार, या तलावात एकावेळी एकच मगर राहते. एक मगर मेली की दुसरी मगर आपोआप तलावात राहायला येते. मात्र, ती कुठून येते, हे आजपर्यंत कळाले नाही.