राहुल गांधींची खासदारकी रद्द करणार? भाजपाकडे असे 'ब्रम्हास्त्र' जे फक्त इंदिरा गांधींनीच पेलवलेले By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 09:11 AM 2023-03-19T09:11:55+5:30 2023-03-19T09:19:05+5:30
संसदेच्या इतिहासात आजपर्यंत चारवेळा खासदारांवर कारवाई करण्यात आली होती. त्यात भाजपाचे सुब्रमण्यम स्वामी, इंदिरा गांधींचा देखील समावेश आहे. राहुल गांधी यांनी युरोप आणि अमेरिकेत जाऊन देशाची प्रतिमा धुळीला मिळविली आहे. यामुळे त्यांना संसदेतून काढून टाकण्याची वेळ आली आहे. त्यांचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आणावे, अशी मागणी भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे. लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून त्यांनी विशेष समिती बसवून चौकशी करावी आणि कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
राहुल गांधी खासदार आहेत, खासदारांचे निलंबन ऐकले आहे. परंतू खासदारांचे सदस्यत्व रद्द केले जाते का? करता येते का? या प्रश्नावर उत्तर हो असे आहे. इतिहासात चारवेळा खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यात एकदा तर खुद्द इंदिरा गांधी होत्या. यामुळे जर भाजपाने ठरविले तर राहुल गांधींचेही सदस्यत्व रद्द होऊ शकते.
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे नेते एचजी मुद्गल यांच्यावर 1951 मध्ये संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्यावरून कारवाई झाली होती. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी एक समिती बनविण्याचा प्रस्ताव संमत केला होता. मुद्गल दोषी आढळल्याने त्यांची सदस्यता रद्द करण्यात आली होती. प्रस्ताव येण्यापूर्वीच मुद्गल यांनी राजीनामा दिला होता. तरी देखील प्रस्ताव आणण्यात आला होता.
1976 मध्ये स्वामी.... यानंतर १९७६ मध्ये सुब्रमण्यम स्वामींची खासदारकी रद्द करण्यात आली होती. संसदेला बदनाम करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. स्वामी आणीबाणीवेळी जनसंघाचे नेते होते आणि राज्यसभेचे खासदार होते. देश-विरोधी प्रोपोगंडात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
१९७८ इंदिरा गांधींना तुरुंगवास 1978 मध्ये इंदिरा गांधींवर विशेषाथधिकाराचे उल्लंघन आणि संसदेचा अवमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यांच्यावर कामात व्यत्यय आणणए, काही अधिकाऱ्यांना धमकावणे, शोषण करणे आणि खोटे खटल्यांमध्ये अडकविल्याचा आरोप होता.
२० डिसेंबर 1978 ला त्यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. तसेच अधिवेशन सुरु असेपर्यंत तुरुंगात पाठविण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतू एक महिन्याने लोकसभेने त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल केले होते.
२००५ मध्ये ११ जणांची खासदारकी रद्द मुद्गल यांच्यासारखाच प्रकार २००५ मध्ये समोर आला होता. एका टीव्ही चॅनलने केलेल्या स्टिंगमध्ये काही पक्षांचे ११ खासदार संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेताना दिसले होते. यात १० लोकसभा आणि १ राज्यसभा खासदार होते. 5 सदस्यांच्या समितीत भाजपाचे वी के मल्होत्रा, सपाचे राम गोपाल यादव, सीपीआई-एमचे मोहम्मद सलीम आणि डीएमकेचे सी कुप्पुसामी हे होते. त्यांनी दिलेल्या ३७ पाणी अहवालानंतर ११ जणांचे सदस्यत्व रद्द केले होते.
राहुल गांधींवर कारवाई होणार का? राहुल गांधींवरही कारवाई होऊ शकते. लोकसभा अध्यक्ष चौकशी समिती बसवू शकतात. त्यात राहुल दोषी आढळले तर त्यांच्यावर ही कारवाई होऊ शकते. परंतू भाजपा याचा राजकीय परिणाम लक्षात घेऊन पुढील पाऊल टाकेल, असे काही जाणकारांचे मत आहे.