congress president mallikarjun kharge life struggle here is his full life story
काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची संघर्षगाथा: आईला समोर जळताना पाहिलं, गरीबांसाठी लढले अन् मित्रासाठी CM पद सोडलं! By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 04:18 PM2022-10-19T16:18:36+5:302022-10-19T16:43:41+5:30Join usJoin usNext काँग्रेस पक्षाला अखेर नवे अध्यक्ष मिळाले आहेत. १३७ वर्ष जुन्या काँग्रेस पक्षाला ८० वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. सुमारे दोन दशकानंतर काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच पक्षाला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. पक्षाच्या अध्यक्षपदी पोहोचण्यापर्यंतचा खर्गे यांचा आजवरचा प्रवास काही सोपा नव्हता. खर्गेंच्या आयुष्यातील संघर्ष पाहिला की त्यांची खरी ताकद लक्षात येते. त्यांचं मोठंपण जाणवतं. नऊ वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी 1972 मध्ये पहिल्यांदा निवडणुक लढवली. तेव्हापासून ते फक्त एकदाच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. खर्गे यांचा संघर्ष जाणून घ्यायचा असेल तर त्यांच्या गावात म्हणजेच कर्नाटकमधील वरवट्टी गावातून सुरुवात करावी लागेल. १९४७ सालच्या ऑगस्ट महिन्यात कर्नाटकमधील वरवट्टी गावात निजामाची राजवट होती. भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा या भागातही हिंदू-मुस्लिम दंगली उसळल्या होत्या. निजामाच्या सैन्याने वरवट्टी गावावर हल्ला केला. त्यांच्या सोबत लुटारु देखील होते. त्यांनी संपूर्ण गाव पेटवून दिलं. याच गावातील एका घरात एका ५ वर्षाच्या मुलानं स्वत:च्या आईला जिवंत जळताना पाहिलं. तो पाच वर्षांचा मुलगा म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून मल्लिकार्जुन खर्गे हेच होते. वडीलांनी मल्लिकार्जुन यांना वाचवलं आणि गावापासून दूर नेलं. त्यानंतर ते ३ महिने जंगलातच राहिले. मुलाला काम करायला लावण्याऐवजी यांनी शिक्षण देणं कर्तव्य समजलं. यातूच मल्लिकार्जुन घडू लागले. मोठे होऊन मल्लिकार्जुन आधी वकील झाले, मग केंद्रीय नेते, आमदार, मग कर्नाटक राज्यात मंत्री, खासदार, केंद्र सरकारमध्ये मंत्री आणि आता थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. मल्लिकार्जुन यांच्यात नेतृत्वाचे गुण लहानपणापासूनच होते. ते शाळेतही वर्गाचे मॉनिटर होते. कॉलेजमध्ये गेल्यावर ते विद्यार्थी नेते झाले. गुलबर्गा जिल्ह्याचे पहिले दलित बॅरिस्टर झाले, मग पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. 9 वेळा निवडून आले, दोनदा खासदारही होते. तीन वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्याची त्यांची संधी हुकली. कबड्डीची होती प्रचंड आवड मल्लिकार्जुन लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होतेच. पण ते कबड्डीचेही चांगले खेळाडू होते. शालेय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसं प्राप्त केली आहेत. ते राजकारणात गेले नसते तर एक चांगले कबड्डीपटू नक्कीच झाले असते, असे त्यांच्या जवळचे लोक सांगतात. त्यांना कबड्डीसोबतच हॉकीचीही आवड होती. मल्लिकार्जुन यांनी नूतन स्कूलमधून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी शासकीय महाविद्यालयातून पदवी घेतली. गुलबर्गा येथील सेठ शंकरलाल लाहोटी लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. विशेष म्हणजे खर्गी हे गुलबर्गाचे पहिले दलित वकील होते. मल्लिकार्जुन यांचे वडील एकेकाळी ज्या MSK मिलमध्ये काम करायचे त्याच मिलचे कायदेशीर सल्लागार म्हणून मल्लिकार्जुन यांची नियुक्ती करण्यात आली. पुढे कामगारांच्या आग्रहावरुन खर्गे युनियनचे नेते झाले. कामगारांचे आणि मजुरांचे खटले ते लढवत असत. मजुरांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे ते मोफत खटले लढायचे. त्यामुळे खर्गे यांच्याबद्दल कामगारांमध्ये आपुलकी निर्माण झाली. मल्लिकार्जुन पुढे राजकारणात आले. 1970 मध्ये मल्लिकार्जुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बनले. राजकारणात गेल्यावर त्यांना प्रसिद्धीचं वलय प्राप्त झालं आणि लोकांचा मोठा पाठिंबाही मिळू लागला. कर्नाटकात कॉंग्रेसची सत्ता आली तेव्हा मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी नेहमीच आघाडीवर राहिलं आहे. पण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीनं खर्गे यांना नेहमीच हुलकावणी दिली. २००४ साली मल्लिकार्जुन खर्गे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले होते, परंतु या पदासाठी त्यांचा मित्र धरम सिंह यांचे नाव पुढे येताच मल्लिकार्जुन स्वत: मागे हटले. 2013 मध्ये मल्लिकार्जुन यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार होती. पण शेवटच्या क्षणी सिद्धरामय्या यांचे नाव पुढे करण्यात आले. असं असलं तरी खर्गे यांचं पक्षातील वजन मात्र वाढतच राहिलं आणि आज ते थेट पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. टॅग्स :मल्लिकार्जुन खर्गेकाँग्रेसMallikarjun Khargecongress