CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! नव्या रुग्णांच्या संख्येत झाली दुप्पट वाढ; 'या' राज्यांनी वाढवली चिंता By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 06:00 PM 2021-03-16T18:00:20+5:30 2021-03-16T18:19:39+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातही कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना संसर्गाचा वेग वाढला असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल 11 कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंगसारखे नियम पाळले जात आहेत.
भारतातही कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना संसर्गाचा वेग वाढला असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत आहे. कोरोनाचा पुन्हा एकदा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,14,09,831 वर पोहाचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,58,856 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 24,492 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 131 जणांचा मृत्यू झाला आहे. मार्चमध्ये आता नव्या रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
एक मार्च रोजी देशात 11563 नवे रुग्ण आढळून आले होते. तर आता त्याच्या दुप्पट म्हणजेच जवळपास 24 हजारांहून अधिक रुग्ण दररोज आढळून येत आहेत. देशात लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली असून आतापर्यंत लाखो लोकांनी लस घेतली आहे.
काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. महाराष्ट्र, पंजाब, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
जवळपास 82 टक्के नवीन केसेस या सहा राज्यांशी संबंधित आहेत. गुजरामध्ये देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने राज्य सरकारने मंगळवारी चार मोठ्या शहरांत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये दिवसाला 800 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार 17 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत अहमदाबाद, सूरत, राजकोट आणि वडोदरा या चार मोठ्या शहरांत नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. हा नाईट कर्फ्यू रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहील.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या कोर कमिटीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
गुजरातमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही दोन लाखांच्या वर गेली आहे. तर चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. काहींनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.
महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील नागपूरसह काही ठिकाणी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. पंजाबच्या आठ जिल्ह्यांत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.
राज्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने नियम कडक केले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये देशातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.