Cyclone Mandous: 'मंदोस'चा हैदोस! तामिळनाडूत घराचे पत्रे उडाले, शाळा-महाविद्यालय बंद; महाराष्ट्रात काय होणार? By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 01:59 PM 2022-12-10T13:59:16+5:30 2022-12-10T15:18:21+5:30
Cyclone Mandous: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. दक्षिणेतील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरातून उठणाऱ्या मंदोस चक्रीवादळ थैमान घालण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळामुळे तिन्ही राज्यांमध्ये मुसळधार पावसासोबत वादळी वारेही वाहण्याची शक्यात हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे चेन्नईपासून 900 किमी आग्नेयेस जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर तिन्ही राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नसला तरी दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.
3 तासात सुमारे 65 झाडे पडली आहेत. वादळामुळे मदुरांतकम, ईसीआर आणि ओएमआरमध्ये अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यांना दूर करण्यासाठी जीसीसी उपाययोजना करत आहे.
येत्या काही तासांत मंदोस चक्रीवादळात कमकुवत होईल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा IMD चा इशारा लक्षात घेता, तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
मंदोस चक्रीवादळामुळे चेन्नई आणि कुड्डालोरसह 16 जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
चेन्नईमध्ये सुरक्षा, मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी 16,000 पोलीस आणि 1500 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच तामिळनाडू आपत्ती प्रतिसाद दलाचे 40 सदस्य आणि जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाच्या 12 सदस्यांना स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती? बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ सध्या आग्नेयेकडून वायव्येकडे जात आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर विशेष असा काही परिणाम होण्याची शक्यता नाही. याबाबत हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे.
चक्रीवादळाचा विशेष परिणाम हा महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अवकाळी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीवर परिणाम होणार आहे. राज्यात सध्या असणारा थंडीचा जोर कमी होणार आहे. थंडीला कदाचित आठवडाभरच अटकाव होण्याची शक्यता आहे.