फक्त 28 हजार मतांचा फरक अन् अरविंद केजरीवाल सत्तेतून बाहेर, पाहा आकडेवारी..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 19:00 IST2025-02-10T18:51:29+5:302025-02-10T19:00:16+5:30
Delhi Election Interesting Data: दिल्ली विधानसभा निवडणुकीत BJP ने 48 आणि AAP ने 22 जागांवर विजय मिळवला आहे.

Delhi Election Interesting Data: नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (AAP) दारुप पराभव झाला. तर, अडीच दशकांनंतर दिल्लीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. भाजपने 48 जागा जिंकल्या, तर आपला 22 जागांवर घसरली.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत सलग तीनवेळा दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या अरविंद केजरीवालांसह पक्षाच्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. आपसाठी हा अत्यंत लाजीरवणा पराभव झाला. कारण यापूर्वी आपने 2015 मध्ये 67 आणि 2020 मध्ये 62 जागा जिंकल्या होत्या.
आपच्या पराभवाचा विचार करता, पक्षाला 2020 च्या तुलनेत सुमारे 10 टक्के कमी मते मिळाली. यंदा 'आप'ला 43.57 टक्के मते मिळाली आहेत. तर, भाजपला 45.56 टक्के मते मिळाली आहेत. म्हणजेच, यंदाच्या निवडणुकीत फक्त सूमारे 2 टक्के मतांच्या फरकामुळे आप सत्तेबाहेर गेला.
दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 36 जागांची आवश्यकता असते. सध्या 'आप'कडे 22 जागा आहेत, म्हणजेच पक्षाने आणखी 14 जागा जिंकल्या असत्या तर अरविंद केजरीवाल चौथ्यांदा दिल्लीच्या खुर्चीवर विराजमान झाले असते. दिल्लीतील 14 जागांवर आम आदमी पक्षाला केवळ 28,103 अधिक मते मिळाली असती, तर 'आप'ने सरकार स्थापन केले असते.
दिल्लीत अशा 14 जागा आहेत, जिथे भाजपने 344 ते 8952 मतांनी विजय मिळवला आहे. या 14 जागांवर भाजपच्या विजयात एकूण 56177 मतांचा वाटा आहे. पण, विजय हा एक मताचा असला तरी विजय असतो. आपण आकडेवारी बघितली, तर यापैकी 28,103 मते 'आप'च्या बाजूने गेली असती, तर कदाचित निकाल बदलला असता.
म्हणजेच, आम आदमी पक्षाला या 14 जागांवर फक्त 28,103 जास्त मते मिळाली असती, तर पक्षाचा आकडा 36 वर पोहोचला असता आणि दिल्लीत केजरीवालांचे सरकार बनले असते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सलग तिसऱ्यांदा एकही जागा जिंकता आली नाही. मात्र, यावेळी पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत किंचित वाढ झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला 6.34 टक्के मते मिळाली आहेत. यापूर्वी 2020 मध्ये पक्षाला केवळ 4.3 टक्के मते मिळाली होती.