बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 10:51 PM2024-09-30T22:51:14+5:302024-09-30T22:57:12+5:30

Haryana Assembly Election 2024: हरियाणामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येथे सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या इराद्याने भाजपा तर दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता मिळवण्याच्या इराद्याने काँग्रेसने कंबर कसली आहे. येथे भाजपासमोर अँटी इन्कम्बन्सीसह अनेक आव्हानं आहेत. तर सत्ता मिळण्याच्या काँग्रेसच्या मार्गातही अनेक अडचणी आहेत. दरम्यान, अशी काही आव्हानं आहेत. ज्यांचा काँग्रेस आणि भाजपाला समाप प्रमाणात सामना करावा लागत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपासाठी आव्हान ठरत असलेले समान मुद्दे पुढील प्रमाणे आहेत.

हरियाणामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येथे सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या इराद्याने भाजपा तर दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता मिळवण्याच्या इराद्याने काँग्रेसने कंबर कसली आहे. येथे भाजपासमोर अँटी इन्कम्बन्सीसह अनेक आव्हानं आहेत. तर सत्ता मिळण्याच्या काँग्रेसच्या मार्गातही अनेक अडचणी आहेत. दरम्यान, अशी काही आव्हानं आहेत. ज्यांचा काँग्रेस आणि भाजपाला समाप प्रमाणात सामना करावा लागत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपासाठी आव्हान ठरत असलेले समान मुद्दे पुढील प्रमाणे आहेत.

हरियाणामध्ये भाजपापासून काँग्रेसपर्यंत सर्व पक्षांना बंडखोरीने त्रस्त करून सोडलं आहे. उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर दोन्ही पक्षांमधील बंडखोरी उघडपणे समोर आली आहे. दोन्ही पक्षांचे अनेक नेते बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये अनेक शक्तिशाली नेते बंडखोरी करून रिंगणात उतरल्याने काँग्रेस आणि भाजपा अशा दोन्ही पक्षांचं टेन्शन वाढलं आहे.

भाजपा आणि काँग्रेससाठी पक्षातील मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार ही मोठी डोकेदुखी ठरत आहेत.काँग्रेसकडून भूपेंद्रसिंह हुड्डा हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. तर कुमारी शैलजा यांनीही मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकला आहे. या दोघांशिवाय रणदीप सुरजेवाला हेही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तर भाजपामध्येही मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विद्यमान मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी हेच भाजपाचा चेहरा असतील, अशी घोषणा अमित शाह यांनी केली आहे. मात्र अनिल विज यांच्यापासून ते राव इंद्रजित यांच्यापर्यंत अनेकजण भाजपामधून मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.

हरियाणाच्या राजकारणात राजकीय घराणेशाही हा मोठा फॅक्टर आहे. अनेक वर्षांपर्यंत राज्याचं राजकारण चालवलेल्या भजनलाल, बंसीलाल आणि देवीलाल यांची कुटुंबं राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. पैकी देवीलाल यांचे वारस आयएनएलडी आणि जेजेपी यांच्या माध्यमातून राज्यात राजकारण करत आहेत. तर इतर दोन नेत्यांच्या पुढच्या पिढ्या काँग्रेस आणि भाजपामध्ये विस्तारल्या आहेत. भजनलाल यांचे पुत्र कुलदीप बिश्नोई आणि बंसीलाल यांच्या सुनबाई किरण चौधरी भाजपामध्ये आहेत. या नेत्यांच्या आपापल्या महत्त्वाकांक्षा आहेत.

राज्याच्या राजकारणातील मुद्द्यांसोबत मुद्देही भाजपा आणि काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यामध्ये भाजपासाठी पंजाबमधील शेतकरी आंदोलन, दिल्लीमधील कुस्तीपटूंचं आंदोलन अडचणीचे ठरत आहेत. तर भाजपा हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमधील काँग्रेसची अपुरी आश्वासनं, राहुल गांधींनी अमेरिकेत आरक्षणावरून केलेलं विधान यांना मुद्दा बनवत काँग्रेसची कोंडी करत आहे.