If you fulfill one condition, you will get 2 tickets in one family- Congress
‘ही’ अट पूर्ण केल्यास एकाच कुटुंबात मिळतील २ तिकीट; काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ठरलं By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 03:07 PM2022-05-15T15:07:17+5:302022-05-15T15:10:25+5:30Join usJoin usNext राजस्थानच्या उदयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात २०२४ ची रणनीती आखली जात आहे. या चिंतन शिबिराच्या माध्यमातून आगामी निवडणुकीत पक्षाची धोरणं, भविष्यातील योजना, मुद्दे यावर विचारविनिमय करण्यात आला आहे. काँग्रेस संघटनेच्या प्रस्तावानुसार, एक कुटुंब एक तिकीट या निर्णयात बदल करत सदस्यांच्या मागणीमुळे गांधी कुटुंबाला पाहता नियमांमध्ये काही सूट दिली आहे. आता एका कुटुंबातील २ व्यक्तींना तिकीट मिळू शकते परंतु त्यासाठी त्यांना संघटनेत ५ वर्ष काम करणं बंधनकारक असेल. संघटनेत कोणत्याही पदावर ५ वर्षे राहिल्यानंतर, ३ वर्षांचा कूलिंग पिरियड ठरवल्यावरच कोणतेही पद उपलब्ध होईल. याशिवाय बहुसंख्य जनतेला लक्ष्य करण्यासाठी काँग्रेस आता सॉफ्ट हिंदुत्वाच्या विचारसरणीवर पुढे जाईल. म्हणजेच पक्षाचे नेतृत्व आपल्या धोरणांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सॉफ्ट हिंदुत्वाचा मुद्दा ठळकपणे मांडेल. आरक्षणापासून दुरावलेली काँग्रेस आता आरक्षणाचा अवलंब करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ओबीसी, दलित, अल्पसंख्याक आणि महिलांना पुढे आणण्यावर पक्षाची नजर असेल. महिला आरक्षणावर पक्ष आपल्या विचारसरणीत मोठा बदल करू शकतो. महिला आरक्षणाच्या मुद्यावर पक्ष आता आरक्षणासाठी सज्ज झाला आहे. त्याचबरोबर आता पक्षातील मागासलेल्या व्यक्तींसाठी स्वतंत्र सल्लागार समिती स्थापन करण्यात येणार असून, ही समिती देशभरातील आकडेवारी गोळा करून त्यानुसार धोरण ठरवणार आहे याशिवाय दलित आदिवासी अल्पसंख्याक आणि महिलांच्या प्रश्नावर आता दर सहा महिन्यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली जाणार आहे. कुठल्या राजकीय मुद्द्यावर प्रस्ताव आणणार? संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी आणि भाजप आणि आरएसएसच्या अजेंडापासून देशाला वाचवण्यासाठी गांधी-नेहरू-आंबेडकरांच्या तत्त्वांवर पुढे जावे लागेल. चीनकडून सातत्याने होत असलेली घुसखोरी आणि अतिक्रमण, सत्य लपविण्याच्या प्रयत्नांवर मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करत सरकारकडून चीनच्या घुसखोरीबाबत श्वेतपत्रिका काढण्याच्या मागणीवर निर्णय घेऊ शकते. या चिंतन शिबिरात सहा वेगवेगळ्या गटातील ४३० नेते राजकारण, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, अर्थव्यवस्था, संघटना, शेतकरी आणि शेती आणि युवक या विषयांवर चर्चा करत आहेत. प्रत्येक गटात सुमारे ७० नेते आहेत. तीन दिवसांच्या विचारमंथनाची संपूर्ण तयारी देशातील हरवलेला जनाधार परत मिळवण्यासाठी आहे, पण काँग्रेस जनतेचा विश्वास कसा जिंकू शकते, हे पुढे कळेल. दरम्यान, अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत आचार्य प्रमोद कृष्णन यांनी सोनिया यांच्या समक्ष हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष व्हावे, ही सगळ्यांची इच्छा आहे. हे पद त्यांनी स्वीकारावे यासाठी २ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु ते तयार नाहीत. राहुल गांधी यासाठी राजी नसतील तर प्रियांका गांधी यांच्याकडे अध्यक्षपद सोपवा. यावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी कृष्णन यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु कृष्णन यांनी त्यास दाद दिली नाही. नंतर अनेक नेत्यांनीही कृष्णन यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. प्रियांका गांधीही यावेळी उपस्थित होत्या.टॅग्स :काँग्रेसcongress