कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 01:40 PM2024-06-02T13:40:38+5:302024-06-02T13:51:57+5:30

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशातील चर्चेत राहिलेल्या मतदारसंघांमध्ये काय निकाल लागणार याबाबतही उत्सुकता आहे. तसेच काही प्रमुख मतदारसंघातील एक्झिट पोलही आता समोर येऊ लागले आहे. इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार यापैकी काही प्रमुख मतदारसंघातील संभाव्य निकाल पुढील प्रमाणे आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३५० ते ४०० जागा मिळतील, असा दावा एक्झिट पोलमधून करण्यात आला आहे.

देशातील चर्चेत राहिलेल्या मतदारसंघांमध्ये काय निकाल लागणार याबाबतही उत्सुकता आहे. तसेच काही प्रमुख मतदारसंघातील एक्झिट पोलही आता समोर येऊ लागले आहे. इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार यापैकी काही प्रमुख मतदारसंघातील संभाव्य निकाल पुढील प्रमाणे आहेत.

अभिनेत्री कंगना राणावत निवडणूक लढवत असल्याने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकभा मतदारसंघावर देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून कंगना राणावत आणि काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांच्यात लढत होत आहे. अटीतटीच्या होत असलेल्या या लढतीमध्ये कंगना राणावत बाजी मारताना दिसत आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये यावेळी आप आणि काँग्रेस यांची इंडिया आघाडी विरुद्ध भाजपा यांच्यात लढत झाली. दरम्यान, दिल्लीतील उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघावर सर्वांचं लक्ष होतं. त्याचं कारण म्हणजे भाजपाचे मनोज तिवारी आणि काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांच्यात येथे थेट लढत झाली. आता एक्झिट पोलमधील अंदाजानुसार या मतदारसंघात मनोज तिवारी हे आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहेत.

यावेळी ओदिशामध्ये भाजपा मोठी आघाडी घेईल असे संकेत एक्झिट पोलमधून मिळत आहेत. दरम्यान, ओदिशामधील पुरी लोकसभा मतदारसंघात भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा आणि बीजू जनता दलाचे अनुप पटनाईक यांच्यात थेट लढत झाली. एक्झिट पोलनुसार या लढतीमध्ये संबित पात्रा यांना आघाडी मिळताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील सांगली लोकसभा मतदारसंघातील लढतही यावेळी लक्षवेधी ठरली होती. येथे भाजपाचे संजयकाका पाटील, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये विशाल पाटील हे मुसंडी मारताना दिसत असून, त्यांचा विजय होण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे.

केरळमध्ये यावेळी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळणाऱ्या मतांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, केरळमधील तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि भाजपाचे उमेदवार राजीव चंद्रशेखर यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली होती. एक्झिट पोलनुसार या मतदारसंघात राजीव चंद्रशेखर यांचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूमध्ये या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे युवा नेते अण्णामलाई यांच्या नावाची खूप चर्चा झाली. तसेच मतदारांवर प्रभावही दिसून आला. त्यामुळे अण्णामलाई निवडणूक लढवत असलेल्या कोईंबतूर लोकसभा मतदारसंघावर सर्वांचं लक्ष होतं. कोईंबतूरमध्ये भाजपाच्या अण्णामलाई यांच्यासमोर डीएमकेच्या गणपती राजकुमार यांचं आव्हान होतं. तसेच इथे गणपती राजकुमार हे आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

युवा नेता रवींद्र सिंह भाटी याने रिंगणात उडी घेतल्याने राजस्थानमधील बाडमेर लोकसभा मतदारसंघामधील निवडणूक अटीतटीची झाली होती. येथे अपक्ष रवींद्र सिंह भाटी आणि काँग्रेसचे उमेदराम बेनिवाल यांच्यात मुख्य लढत झाली. तर येथे भाजपाचे कैलाश चौधरी तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाण्याची शक्यता आहे. तसेच एक्झिट पोलमधील अंदाजानुसार बाडमेरमधून रवींद्र सिंह भाटी हे आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.