Photos: दिग्गज काँग्रेस नेत्याची महाकुंभात हजेरी; कुटुंबासह त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 19:24 IST2025-02-09T19:20:38+5:302025-02-09T19:24:47+5:30
Maha Kumbh 2025: महाकुंभाच्या आयोजनाबद्दल योगी सरकारचे तोंडभरुन कौतुकही केले.

DK Shivakumar at Maha Kumbh 2025: त्रेविणी संगमावर वसलेल्या प्रयागराजमध्ये अनेक पवित्र महाकुंभाचे आयोजन केले आहे. या महाकुंभात स्नान करण्यासाठी जगभरातील भाविकांसह अनेक नेतेही येत आहेत. आतापर्यंत भाजप किंवा एनडीएतील नेते महाकुंभात येत होते, पण आता एका दिग्गज काँग्रेस नेत्यानेही कुटुंबासह महाकुंभात स्नान केले.
हे काँग्रेस नेते दुसरे-तिसरे कोणी नसून, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार(DK Shivkumar) आहेत. त्यांनी रविवारी (9 फेब्रुवारी, 2025) प्रयागराज कुटुंबासह गंगेत स्नान केले. यावेळी त्यांनी महाकुंभच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उत्तर प्रदेशातील योगी सरकारचे अभिनंदनही केले.
डीके शिवकुमार मीडियाशी बोलताना म्हणाले, या पवित्र कार्यक्रमासाठी सर्व आयोजकांचे आभार. कोणाच्याही आयुष्यातील हा एक ऐतिहासिक क्षण आहे. येथे आलेल्या करोडो लोकांसाठी सरकारने जी व्यवस्था केली आहे, ते काही लहान काम नाही. योगी सरकारने चांगले आयोजन केले आहे. मी महाकुंभात आलो, याचा मला खूप आनंद आहे.
विशेष म्हणजे, डीके शिवकुमार यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मंत्री नंद गोपाल गुप्ताही उपस्थित होते. डीके शिवकुमार म्हणाले की, उत्तर प्रदेश सरकारचे वरिष्ठ मंत्री मला भेटण्यासाठी बंगळुरूला आले होते आणि त्यांनीच मला महाकुंभमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. माझ्यासाठी हा एक अद्भुत अनुभव होता.
महाकुंभ हा आपल्या देशाचा सर्वात मोठा वारसा आणि संस्कृती आहे, असे आम्ही कर्नाटकातही म्हणत आहोत. ही आजची गोष्ट नाही, तर हजारो वर्षांपूर्वी आपल्या इतिहासकारांनी, दैवी शक्तींनी ती घडवली आहे आणि त्यात आपण सर्वांनी सहभाग घेतला आहे, अशा भावनाही शिवकुमार यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, या दौऱ्यानंतर पुन्हा एकदा डीके शिवकुमार यांच्या बंडाची अटकळ सुरू झाली आहे. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यापासून पक्षातील एक गट शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहे. आता त्यांचे महाकुंभात येणे आणि योगी सरकारचे कौतुक करणे, यावरुन चर्चेला उधाण आले आहे.