सचिन पायलट यांनी आईला न सांगताच विमान उडवण्याचं लायसन्स मिळवलं होतं, पण... By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 01:27 PM 2020-07-15T13:27:36+5:30 2020-07-15T13:58:17+5:30
राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष (Rajasthan Political Crisis) करणाऱ्या काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट (Sachin Pilot) यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही सचिन पायलट यांना हटवण्यात आलं आहे.
सचिन पायलट यांनी 2002 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये ते राजकारणाच्या पायऱ्या झपाझप चढल्या. सचिन पायलट 23 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडील राजेश पायलट यांचा एका अपघातात मृत्यू झाला. त्या घटनेने सचिन पायलट यांच्या आयुष्याची दिशाच बदलली.
सचिन पायलट यांच्यासाठी राजकारण नवीन नव्हतं. भारतीय राजकारणात त्यांचे वडील राजेश पायलट यांचं नाव मोठं आहे. त्यांच्या आई रमा पायलट यादेखील आमदार आणि खासदार होत्या.
सचिन पायलट यांनी लहानपणापासूनच भारतीय हवाई दलात भरती होण्याचंही त्यांचं स्वप्न होतं. मात्र, माझी दृष्टी थोडी कमकुवत असल्याचे कळल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही, असं सचिन पायलट यांनी सांगतिले.
शाळेत मुलं मला माझ्या पायलट या आडनावावरून चिडवायचे. त्यावेळी मी माझ्या आईला न सांगताच विमान उडवण्याचं लायसन्स मिळवलं, असं सचिन पायलट यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र, वडिलांच्या अपघाती निधनानंतर सचिन पायलट यांनी राजकारणात प्रवेश केला.
2013 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 21 जागा मिळाल्या होत्या. मात्र, 2018 मध्ये पक्षाने 99 जागांपर्यंत मजल मारली.
मात्र, जेव्हा मुख्यमंत्रिपदी वर्णी लागायची वेळ आली त्यावेळी अशोक गहलोत यांची निवड झाली आणि सचिन पायलट यांना उप-मुख्यमंत्रीपद देण्यात आलं.
2018 च्या निवडणुकीत त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी त्यांनी राज्याचा कानाकोपरा फिरून 2013 मध्ये काँग्रेसपासून दूर गेलेल्या किंवा हताश झालेल्या मतदाराचं मन वळवलं.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक अशी सचिन पायलट यांची ओळख आहे. आपलं म्हणणं अत्यंत स्पष्टपणे मांडणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं.
सरकारविरोधात बंड करणाऱ्या सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांविरोधात काँग्रेसनं कठोर कारवाई केली आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्यात आलं आहे. तर त्यांच्या समर्थक आमदारांची मंत्रिपदं काढून घेण्यात आली आहेत. काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी याबद्दलची माहिती दिली.
'पूर्ण बहुमतानं निवडून आलेलं सरकार पाडण्यामागे भाजपाचं षडयंत्र आहे. सत्ता आणि पैशांचा वापर करून, ईडी आणि आयकर विभागाकडून दबाव आणून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस आमदारांना पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहेत. भाजपानं सरकार पाडण्यासाठी रचलेल्या कारस्थानात पायलट अडकले आणि त्यांनी जनतेनं निवडून दिलेल्या सरकारला धक्का लावण्याचा प्रयत्न केला,' अशा शब्दांत सुरजेवाला यांनी सचिन पायलट आणि भाजपा यांचा समाचार घेतला.
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून दूर करतानाच त्यांच्या समर्थक आमदारांवरही पक्षानं कारवाई केली आहे. विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. 'आम्ही गेल्या ७२ तासांपासून सचिन पायलट यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत.
राहुल गांधी यांच्या माध्यमातून सोनिया गांधींनी पायलट यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला गेला. के. सी. वेणुगोपाल त्यांच्याशी अनेकदा बोलले. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न झाले. पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असल्याचं सांगण्यात आलं. काही मतभेद असल्यास संवादाच्या माध्यमातून सोडवता येईल, असं आवाहन करण्यात आलं. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही,' असं सुरजेवाला यांनी सांगितलं.